छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दुर्मीळ ग्रंथांचा वापर कमी झाला असल्याची धक्कादायक आकडेवारी आहे. १५ वर्षांच्या कार्यकाळात ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या ३ लाख ९० हजार १७ ग्रंथांची देवघेव आणि हाताळण्यात आलेली संख्या २६ लाख ५ हजार ८१५ एवढी आहे. त्यामुळे विद्यापीठातील असलेल्या अमूल्य खजिन्याचा वापर संशोधक, विद्यार्थ्यांनी अधिक प्रमाणात केला पाहिजे.
राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ग्रंथालय हे दुर्मीळ ग्रंथांनी समृद्ध आहे. ३ लाख ९० हजार १७ ग्रंथांसह ६ हजार २५२ शोधप्रबंध, १४ हजार २९० ई-जर्नल्स आणि ३० लाख ४ हजार ४१ ई-पुस्तकांचाही खजिना ग्रंथालयात आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट लॅब, पीएच.डी. संशोधकांसाठी कॅरल संगणकांसह स्वतंत्र दोन मजली अध्यासिका आहे. विद्यापीठ प्रशासन प्रत्येक वर्षी ग्रंथालयाला अद्ययावत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून देते. त्या तुलनेत त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची आवश्यकता आहे. मागील १५ वर्षांत चार लाख ग्रंथांची फक्त २६ लाख वेळाच हाताळणी करण्यात आली. त्यामुळे सरासरी प्रत्येक वर्षी दीड लाख ग्रंथ हाताळण्यात आले आहेत. उपलब्ध ग्रंथांच्या तुलनेत हाताळण्यात आलेल्या ग्रंथांची संख्या अर्ध्यापेक्षा कमी असल्याचेही आकडेवारीवरून दिसते.
दर्जेदार सेवेसाठी नऊ कोटींचा प्रस्तावविद्यापीठातील ग्रंथालय तथा ज्ञान स्रोत केंद्राला दर्जेदार बनविण्यासाठी नऊ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती प्रभारी संचालिका डॉ. वैशाली खापर्डे यांनी सांगितली. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी ग्रंथालयातील कर्मचारी व अधिकारी तत्पर आहेत. संशोधकांना ते सतत मदत करतात, असे सहायक ग्रंथपाल डॉ. सतीश पद्मे यांनी सांगितले.
राज्यातील सर्वोत्कृष्ट ग्रंथालयराज्यातील सर्वोत्कृष्ट ग्रंथालयांमध्ये आपल्या ग्रंथालयाचा समावेश होतो. या ग्रंथालयामध्ये असलेली ग्रंथसंपदा इतर कोणत्याही विद्यापीठांमधील ग्रंथालयामध्ये नाही. या संपत्तीचा वापर विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांनी करावा. वाचनाची गोडी लावण्यासाठीही विद्यापीठ प्रशासन उपक्रम हाती घेईल.- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू