औरंगाबाद : जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी फुलंब्री, कन्नड, खुलताबाद आणि सिल्लोड या ४ तालुक्यांनी मृत्यूदरात राज्यालाही मागे टाकले आहे. या चारही तालुक्यांचा मृत्यू दर औरंगाबाद जिल्हा आणि राज्यापेक्षाही अधिक आहे. या चारही तालुक्यांतील मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे उभे राहिले आहे.
औरंगाबादेत मार्चमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा एकप्रकारे विस्फोट झाला. दररोज एक ते दीड हजारांच्या घरात नव्या रुग्णांचे निदान हाेत गेले. त्यात ग्रामीण भागांतही रोज पाचशेच्या जवळपास रुग्णांची भर पडत गेली. याबरोबर २० ते ३० च्या संख्येत दररोज रुग्णांचा मृत्यू होत आहे. यात ग्रामीण भागांतील रुग्णांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागांतून थेट शहरात उपचारासाठी येण्याची वेळ रुग्णांवर ओढावत आहे. त्यातही गंभीर रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत घाटी, जिल्हा रुग्णालयात रेफर करण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, मृत्यूचा धोका वाढत आहे.
ग्रामीण भागात आतापर्यंत ५१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील १४१ रुग्णांचा गेल्या महिनाभरातच कोरोनाने बळी घेतला. जिल्ह्यातील फुलंब्री, कन्नड, खुलताबाद आणि सिल्लोड या चार तालुक्यांचा मृत्यूदर राज्यापेक्षाही अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील कोरोना स्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत.
औरंगाबाद तालुक्यात सर्वात कमी मृत्यूदर
जिल्ह्यातील ९ तालुक्यांत औरंगाबाद तालुक्यात सर्वात कमी मृत्यूदर आहे. औरंगाबाद तालुक्याचा १.० टक्के एवढा मृत्यूदर आहे. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या महिनाभरापूर्वी १६ हजार ७०७ होती. त्यात अवघ्या महिनाभरात ९ हजार ४९८ नव्या रुग्णांची भर पडली.
-----
असा आहे मृत्यूदर
राज्य-२.६ टक्के
औरंगाबाद जिल्हा-२.३ टक्के
खुलताबाद-४.१ टक्के
सिल्लोड-३.७ टक्के
फुलंब्री-३.४ टक्के ,
कन्नड-३.० टक्के