शहरात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात होती. १ फेब्रुवारीला फक्त १८ रुग्ण होते तर ग्रामीण भागात ८ रुग्ण होते. त्यामुळे प्रशासनासह महापालिकेचा आरोग्य विभागदेखील निवांत होता, पण पुढील काही दिवसांत संसर्ग एवढ्या झपाट्याने पसरला की, १० मार्चला विक्रमी ६७९ रुग्ण शहरात आढळून आले. मार्च महिना सुरू झाल्यापासून सातत्याने रुग्णांचा आकडा वाढत आहे. सलग सहा दिवस तीनशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. त्यानंतर आकडा चारशे-पाचशेच्या पुढे गेला आहे. मार्च महिन्यात आत्तापर्यंत ४ हजार २६२ रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे डबलींग रेट दहा दिवसांपेक्षा खाली आल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. सध्याची परिस्थिती चिंताजनक असून, कोरोना संदर्भातील नियम म्हणजेच मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर केल्यास संसर्ग नियंत्रणात येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून महापालिकेला सहकार्य करावे.
-------------
लक्षणे दिसताच टेस्ट आवश्यक
कोरोनासंदर्भातील लक्षणे कोणाला असतील तर तातडीने महापालिकेने सुरू केलेल्या कोरोना चाचणी केंद्रावर चाचणी करावी. जेवढ्या लवकर चाचणी केली तेवढा संसर्ग कमी होईल. कुटुंबातील इतर सदस्यांना लागण होणार नाही.