औरंगाबाद : वाळूज येथील छोट्या पंढरपुरात विठ्ठल-रुखमाईचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात. शहरातूनही हजारो भाविक प्रतिपंढरपूरची आषाढी एकादशीला वारी करतात. यंदा १२ जुलै रोजी आषाढी साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पंढरपूर ग्रामपंचायतीच्या मागणीवरून ४० स्मार्ट बस विविध मार्गांवरून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंढरपूरचे सरपंच अख्तर अरीफ शेख, उपसरपंच महेंद्र खोतकर, ग्रामविकास अधिकारी बी.डी. कटारे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी महापौर नंदकुमार घोडेले व आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली होती. आषाढी एकादशीनिमित्त वाळूज येथील पंढरपुरात मोठी यात्रा भरते. ५ ते ७ लाख भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात.
बससेवा नसल्याने भाविकांना प्रवासासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. यंदा १२ जुलै रोजी एक दिवसासाठी मनपाने शहर बसच्या माध्यमातून बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. महापौर घोडेले यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या मागणीवरून सुमारे ४० बस एक दिवसासाठी सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी वाळूज येथील पंढरपूरसाठी मध्यवर्ती बसस्थानक ते पंढरपूर, बीड बायपास, देवळाई चौक ते पंढरपूर, लासूर स्टेशन ते पंढरपूर, गंगापूर ते पंढरपूर, लासूर स्टेशन ते पंढरपूर, बीडकीन ते पंढरपूर, अशा बस सोडण्याचे नियोजन आहे. ग्रामीण भागातील बसचे नियोजन एसटी महामंळ करणार आहे.