औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ४१९ पैकी ४० महाविद्यालयांचे शैक्षणिक मूल्यांकन केले आहे. आॅडिट करताना पारदर्शीपणा राहावा यासाठी अन्य विद्यापीठांच्या तज्ज्ञ व्यक्तीला तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र विद्यापीठ सार्वजनिक कायदा २०१६ नुसार अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांचे ‘शैक्षणिक मूल्यांकन’चा निर्णय घेण्यात आला. यानुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे दरवर्षी संलग्नीकरण समिती पाहणी करीत असते. महाविद्यालयाचे एकूण कर्मचारी, इमारत, ग्रंथालय, लॅब, मैदान आणि इतर भौतिक सुविधांची पडताळणी करून समिती संलग्नीकरणाचा अनुकूल किंवा प्रतिकूल अहवाल सादर करतात. महाविद्यालये सुरू होण्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण होते. मागील वर्षीची कामगिरी पाहून नवीन वर्षी संलग्नीकरणाला मान्यता देण्यात येत असते. मात्र नवीन विद्यापीठ कायद्यानुसार ‘शैक्षणिक मूल्यांकना’चा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १६ व १७ जानेवारीला आॅडिट करण्यासाठी प्राचार्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. यासाठी ५ फेब्रुवारीची मुदत देण्यात आली. प्राचार्यांच्या विनंतीनंतर पुन्हा नोंदणीस ११ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार ४१९ संलग्नित महाविद्यालयांपैकी १४८ महाविद्यालयाचे प्रस्ताव प्राप्त झाले. प्रस्तावाची छाननी करून टप्प्याटप्प्याने मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला. १ ते ९ मार्च या काळात ४० महाविद्यालयांचे मूल्यांकन केले असल्याचे डॉ. तेजनकर यांनी सांगितले.
विद्यापीठांच्या तज्ज्ञांनी केली पाहणीविद्यापीठ प्रशासन दरवर्षी पाहणीचे नियोजन करते. शहर आणि ग्रामीण भागात काही महाविद्यालयांची समान स्थिती असते. प्रवेश घेतलेले विद्यार्थी थेट परीक्षेला हजर असतात. विद्यार्थी नसल्यामुळे प्राध्यापक तासिका घेत नाहीत. महाविद्यालयांत संस्थाचालकांचा हस्तक्षेप वाढलेला असतो. परिणामी शैक्षणिक दर्जा खालावत असल्याचे दिसून येते. हा प्रकार रोखण्यासाठी विद्यापीठाने राज्यातील ८ विद्यापीठांच्या तज्ज्ञांना तपासणीसाठी पाठविले होते.