औरंगाबाद : मराठवाड्याला कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागल्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा उपाययोजनेचा खर्च वाढू लागला आहे. आजवर एसडीआरएफमधून (राज्य आपत्कालीन मदत निधी) आलेल्या ५२ कोटी ५० लाखांपैकी ४० कोटी रुपयांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याचा अहवाल आयुक्तालयाकडे प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यांना दिलेल्या निधीचा वापर कसा झाला याबाबतचा हिशोब करण्यास सुरुवात झाली आहे.
आगामी काळातील उपाययोजनांसाठी ४६७ कोटी ९० लाख रुपयांची मागणी केली असताना एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत एसडीआरएफ फंडातून आलेल्या ५२ कोटी ५० लाखांपैकी आठ जिल्ह्यांनी ४० कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता झाल्या आहेत. मार्च ते एप्रिल या काळात एसडीआरएफ फंडातून मराठवाड्याला ५२ कोटी ५० लाख रुपये देण्यात आले. त्यात आॅगस्टअखेर ४० कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता दिल्याचा अहवाल सर्व जिल्ह्यांनी पाठविला आहे. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक १६ कोटी ५० लाख रुपये औरंगाबाद जिल्ह्याला देण्यात आले होते. हा निधी प्रामुख्याने कोविड केअर सेंटरची उभारणी, तसेच तेथे आवश्यक असलेल्या उपाययोजनांसाठी होता.
२५ टक्के निधी कोरोनासाठीआपत्कालीन उपाययोजनांसाठी मराठवाड्याला ६६३ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यातील २५ % म्हणजे १६५ कोटी रुपये कोविड उपाययोजनांसाठी देण्याचे नियोजन आहे.कोरोनामुळे विभागाच्या नियोजन समितीच्या १५१३ कोटींच्या निधीत कपात करण्यात आली आहे.