छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा आवाज हा आवडीचा असतो. एकाने आवाज दिल्यानंतर त्याला दुसरा व्यक्ती प्रतिसाद देतो; परंतु वर्षाला जवळपास ४० जणांचा आवाजच गप्प होताे. कारण स्वर यंत्राचा कर्करोग. एकट्या शासकीय कर्करोग रुग्णालयात वर्षभरात किमान ४० जणांवर स्वर यंत्र काढण्याची शस्त्रक्रिया होतात. चिंताजनक म्हणजे शिक्षक, गायक, ओरडून व्यवसाय करणाऱ्यांच्या स्वर यंत्रावर सर्वाधिक ताण पडत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
स्वर यंत्र हे श्वासनलिकेवर असल्यामुळे शरीरातील अनेक महत्त्वाच्या क्रियांमध्ये त्याचा सहभाग असतो. श्वास घेण्याच्या अथवा सोडण्याच्या स्थितीमध्ये स्वर तारा पूर्णपणे एकमेकींपासून लांब जाऊन श्वासनलिका पूर्ण उघडी करतात. त्यामुळे व्यक्ती विना अडथळा श्वास घेतो. या उलट गिळताना किंवा आवाजाची निर्मिती करताना स्वर तारा एकमेकींच्या जवळ येऊन श्वासनलिका पूर्ण बंद करतात. स्वर तंतूंच्या या हालचालींमध्ये थोडादेखील बदल झाल्यास त्याचा परिणाम श्वास घेण्यावर, गिळण्यावर किंवा आवाजाच्या निर्मितीवर होतो. त्यामुळे स्वर यंत्राची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.
कोणाला धोका? काही व्यसन असेल तर कर्करोग होतो, असा सामान्यपणे समज आहे. धूम्रपान, मद्यपानासह अनेक कारणांनी स्वर यंत्राचा कर्करोग होऊ शकतो. पण, इतर निर्व्यसनी लोकांनाही तो होऊ शकतो. उच्चार करणे आणि श्वास घेणे हे स्वर यंत्राचे कार्य आहे. स्वर यंत्राचा कर्करोग झाला की, ही कार्य करायला त्रास होतो.
या लक्षणांकडे दुर्लक्ष नको- अचानक आवाज घोगरा होणे.- आवाज बंद होणे.- आवाज बारीक होणे.
...तर फक्त रेडिएशनअगदी सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाले तर केवळ रेडिएशनची गरज पडते. त्यातून आवाज पूर्वीप्रमाणे होऊ शकतो. शिक्षक, गायक, ओरडून व्यवसाय करणाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे.- डाॅ. बालाजी शेवाळकर, रेडिओथेरपी विभागप्रमुख, शासकीय कर्करोग रुग्णालय.
जवळपास १५ जणांना कृत्रिम स्वर यंत्रकर्करोग ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल तर स्वर यंत्र काढावे लागते. वर्षभरात ३० ते ४० रुग्णांचे स्वर यंत्र काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते. तर जवळपास १५ जणांना कृत्रिम स्वर यंत्र बसविले जाते. स्वर यंत्राच्या आराेग्यासाठी भरपूर पाणी पिले पाहिजे. सतत बोलण्याचे काम असेल तर पुरेशी विश्रांतीही घेतली पाहिजे.- डाॅ. महेंद्र कटरे, शासकीय कर्करोग रुग्णालय
आवाजाचा योग्य वापर करावाआवाजाचा योग्य वापर केला पाहिजे. सतत मोठ्याने बोलल्यामुळे स्वर यंत्रावर परिणाम होतो. मोठ्याने बोलल्याने स्वर यंत्राचा कर्करोग होतो, हे अजून तरी सिद्ध झालेले नाही. परंतु तंबाखू, धुम्रपान याबाबी त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.- डाॅ. सुनील देशमुख, कान-नाक- घसा विभागप्रमुख, घाटी