छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणात ४०.६३ टक्के पाणी असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह ४२ पाणीपुरवठा योजना व सहा हजारांहून अधिक लहान - मोठ्या उद्योगांना पुढच्या पावसाळ्यापर्यंत जिवंत साठ्यातून पाणीपुरवठा होणे शक्य होणार आहे. धरणात सध्या ८८२.०९४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. ७ हजार २६९ क्युसेस पाण्याची आवक सध्या सुरू आहे.
दररोज ०.२९ दलघमी पाणी जायकवाडीतून उपसले जाते. वर्षभराचा विचार केला तर ४ टीएमसी पाणी पिण्यासह उद्योगांना लागते. धरणात सध्या सरासरी ३२ टीएमसी जलसाठा आहे, असे जायकवाडी प्रकल्प अभियंता विभागातील सुत्रांनी सांगितले.
शेतीच्या आवर्तनाचा निर्णय नंतर.....रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पाणीपाळ्यांचा (आवर्तन) निर्णय जायकवाडीत ३१ ऑक्टोबर रोजी असलेल्या पाणीसाठ्याच्या अनुषंगाने होईल. दोन्ही हंगामांतील आवर्तनाला लागणारे पाणी आणि धरणातील शिल्लक पाणी यावरच तो निर्णय असेल.
१५ ऑक्टोबरपर्यंत पाणीवाटपाची बैठक१५ ऑक्टोबरपर्यंत पाणीवाटप समितीची बैठक होणे शक्य आहे. या बैठकीत जायकवाडीवरील धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय होईल. वरच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडले तर आवर्तन देण्याच्या निर्णयावर त्याचा सकारात्मक निर्णय होईल.
ऑक्टोबरपर्यंत दरवाजे उघडायचे नाहीत....जिल्ह्यासह मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाचे दरवाजे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १० जुलै रोजी दिले. धरणात फक्त २६ टक्के जलसाठा असल्यामुळे ते आदेश होते. ऑक्टोबर २०२३ पर्यंत धरणात ३३ टक्के जलसाठा आल्यावर पुढील निर्णय होईल, असे त्यांनी म्हटले होते. सध्या ४० टक्के पाणी आहे.
जायकवाडीतून कुणाला किती पाणी?जायकवाडीतून लहान - मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय दोन ते अडीच लाख शेतकरी अवलंबून आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांतील २००हून अधिक गावे, औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित आहे. शहराला रोज १३५ एमएलडी पाणीपुरवठा होतो. उद्योगांना ५२ एमएलडी पाणी उपसा होतो. म्हणजेच शहराला रोज २ द. ल. घ. मी. पाणी लागते. मृत जलसाठ्यातूनही दीड वर्ष पाणीपुरवठा होऊ शकतो. मृत जलसाठ्याची क्षमता ७३८.१०६ द. ल. घ. मी. आहे.
उद्योगांची पाण्याची गरज५२ ते ५५ एमएलडी पाण्याची गरज उद्योगांना आहे. एमआयडीसीच्या योजनांतून हा उपसा होऊन उद्योगांना पाणी पुरविले जाते.शहराची गरजशहराची पाण्याची गरज २६० एमएलडी असून, सध्या १३५ एमएलडी पाणीपुरवठा होताे.