सिल्लोड : आरोग्य विभागामार्फत तालुक्यात क्षयरोग रुग्णांची शोधमोहीम राबविण्यात आली. गावागावात जाऊन थुंकीचे नमुने घेण्यात आले. या तपासणी मोहिमेत ४० क्षयरोग रुग्ण आढळले आहेत, तर तीन अतिगंभीर क्षयरुग्ण (बेडाक्यूईलोने) आढळून आले आहेत. अतिगंभीर तीन रुग्णांपैकी एका रुग्णाच्या उपचारासाठी १६ लाखांचा खर्च लागणार आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
डिसेंबर महिन्यापासून जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, डॉ. विखे पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोग तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत आतापर्यंत ११०७ लोकांची थुंकी घेण्यात आली. त्यापैकी २५० लोकांचे एक्सरे तपासणी व २४० लोकांची सीबीएनएएटी तपासणी करण्यात आली, तर सात रुग्णांची एमडीआर तपासणी करण्यात आली. त्यापैकी तीन रुग्ण अतिगंभीर क्षयरुग्ण आढळून आले. त्यांच्या उपचारासाठी सुमारे १६ लाख रुपये लागतात. त्याचा सर्व खर्च शासनाच्या माध्यमातून केला जाणार आहे, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ व सिल्लोड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश राठोड यांनी सांगितले.
---------------------
फोटो कॅप्शन : पानवडोद आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहशीन खान, डॉ. मयूरी धुमाळ, डॉ. शिल्पा नप्ते यांनी भेट दिली.