वैजापूर (जि. औरंगाबाद): तालुक्यातील घायगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कृष्णा रुस्तुम धने यांना कोटेशन भरून नऊ वर्षे झाली. मात्र, वीज जोडणी मिळाली नाही, त्यात महावितरणचा कहर म्हणजे सदर शेतकऱ्याला चाळीस हजारांचे वीजबिल दिले आहे. महावितरणने हा प्रकार केवळ धने यांच्याबाबतच केलेला नसून, तालुक्यातील सहा हजार जण या भोंगळ कारभाराचे चटके सहन करीत असल्याचे समोर आले आहे.
घायगाव येथील शेतकरी कृष्णा धने यांची गट नंबर १२६ मध्ये शेती आहे. जवाहर रोजगार योजनेंतर्गत शासनाच्या निधीतून २००८ साली त्यांनी या शेतात विहीर खोदली. यानंतर, त्यांनी वीज जोडणीसाठी ५ हजार ३०० रुपये इतके कोटेशन २०१३ साली भरले आहे. मात्र, त्यांना अद्यापपर्यंत जोडणी देण्यात आलेली नाही. गेल्या नऊ वर्षांपासून ते सतत महावितरण कार्यालयात चकरा मारीत आहेत. पर्याय नसल्याने ते तेव्हापासून डिझेल पंपाचा पाणी उपसण्याकरिता वापर करीत आहेत. यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनाही निवेदन पाठविले. मात्र, दखल घेतली गेली नाही. शेवटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून वीज जोडणी देण्याची विनंती केली आहे. ‘लोकमत’ने याबाबत २६ मार्च रोजी ‘मोदीजी चकरा मारून थकलो, आता तरी वीज द्या’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्याने संबंधित विभागाची सारवासारव सुरू आहे. त्यात सदर शेतकऱ्याला ४० हजार रुपयांचे वीज बिल देण्यात आल्याची घटनाही समोर आली आहे. धने हे आकडा टाकून वीज वापरत असल्याचा जावईशोध लावून सदर बिल देण्यात आल्याचे कार्यालयाकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, एकटे धनेच नाही, तर तालुक्यातील सहा हजार शेतकऱ्यांनाही हा त्रास सहन करावा लागत आहे.
अंदाज, तर्कांवर वीजबिल
२०११ साली महावितरणने ‘महावितरण आपल्या दारी’ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत पाच खांबाच्या आत अंतर असलेल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी नसली, तरी आकडा टाकून वीजपंप सुरू करण्यास परवानगी दिली गेली होती, असे कार्यालयाचे म्हणणे आहे. तेव्हापासून ज्या शेतकऱ्यांनी जोडणीसाठी कोटेशन भरले, त्यांना वीजबिल सुरू केले. तालुक्यात असे सहा हजार वीजपंपांचे ग्राहक असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, हे शेतकरी आकडा टाकतात की नाही, याबाबत कुठलीही पाहणी कंपनी करीत नसून, अंदाज व तर्कांच्या आधारेच कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना वीजबिल दिले जात आहे.
या शेतकऱ्याने ‘महावितरण आपल्या दारी’ या योजनेंतर्गत आकडा टाकून विजेचा वापर केलेला आहे. त्या अनुषंगाने त्यांना वीजबिल देण्यात आले आहे.
- राहुल बिडवे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, वैजापूर.
मी कधीही आकडा टाकून वीजचोरी केलेली नाही. मी पिकांना पाणी देण्यासाठी डिझेल इंजिनचा वापर करीत आहे. सध्या डिझेलचे भावही वाढल्याने मला खूप खर्च येत आहे. यासाठी मी वीज जोडणीसाठी महावितरण कार्यालयात चकरा मारीत आहे.
- कृष्णा रुस्तुम धने, शेतकरी, घायगाव.