औरंगाबाद : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आतापर्यंत शहरात ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, उर्वरित ३५० कॅमेरे जुलैअखेरपर्यंत बसविण्याचे काम पूर्ण होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कमांड ॲण्ड कंट्रोल रुममध्ये नियुक्त केल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहराच्या सुरक्षेसाठी ७५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत. एप्रिल महिन्यात या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार होते. मात्र, लॉकडाऊन आणि कोरोना संसर्गामुळे प्रकल्पाचे काम अद्यापही अर्धवटच आहे. असे असले तरी आतापर्यंत ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे आणि महत्त्वाची व्यापारी प्रतिष्ठाने, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी हे कॅमेरे बसविले जात आहेत. याविषयी पोलीस आयुक्त म्हणाले की, आतापर्यंत ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. उर्वरित ३५० कॅमेरे बसविण्याचे काम जुलैअखेरपर्यंत होणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कमांड ॲण्ड कंट्रोल रूममध्ये तीन शिफ्टमध्ये काम चालणार आहे. तेथे काम करण्यास इच्छुक कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जाईल. कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून संंबंधित ठिकाणाची निगराणी करताना काय पाहावे, याविषयी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.