औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात गेल्या दोन वर्षांत मोठी प्रगती झाली आहे. आगामी कालावधीतही त्यात वाढ होणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात ४०० कोटींवर निधी मंजूर झाला असून, त्यातून परभणी- मुदखेड दुहेरीकरण, अकोला- रतलाम मार्ग, औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक ए. के. सिन्हा यांनी दिली.औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर बुधवारी रेल हमसफर सप्ताहानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी खा. चंद्रकांत खैरे, नगरसेवक नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती. परभणी-मुदखेड या ८१ कि. मी.च्या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी ३३१ कोटी रुपये खर्च येणार आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात त्यासाठी १७० कोटी मंजूर झाले आहेत. यावर्षी परभणी-मिरखेल १७ कि. मी. चा मार्ग पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. मनमाड-मुदखेड विद्युतीकरणाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, विद्युतीकरणाचे काम २०२० पर्यंत पूर्ण होईल. तसेच अकोला-रतलाम या ४३ कि. मी. च्या मार्गासाठी २५० कोटी मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली. विभागातील रेल्वे गेट बंद होणार असून, औरंगाबादेतील शहानूरमियाँ दर्गा येथील गेट क्रमांक ५४ देखील बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उड्डाणपुलाचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे, असे सिन्हा म्हणाले.
रेल्वे कामांसाठी यंदा ४०० कोटींवर निधी
By admin | Published: June 02, 2016 1:07 AM