औरंगाबाद : कोरोनाची टांगती तलवार डोक्यावर असतानाही मागील पाच महिन्यांत शहरात तब्बल ४ हजार ११ लग्नसोहळे पार पडले. पोलीस परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आल्याने लग्नसराईत किती लग्न लागतात याची अचूक आकडेवारी पहिल्यांदाच समोर आली आहे.
शहरात दरवर्षी किमान ६ हजारांपेक्षा अधिक लग्नसोहळे पार पडत असतात, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला. मागील वर्षी ऐन लग्न हंगामात कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली. यामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आले. त्यावेळी मार्च ते ऑक्टोबरपर्यंत मंगल कार्यालये बंदच होती. नोव्हेबरपासून ५० वऱ्हाडींच्या साक्षीनेच लग्नसोहळा पार पाडण्याचा नियम लागू करण्यात आला. पहिले महापालिका व पोलीस आयुक्तालयाची परवानगी घेऊनच मंगल कार्यालयात लग्नसोहळे पार पडले जाऊ लागले. मात्र, काही लग्नसोहळ्यांत नियम पायदळी तुडवत शेकडो वऱ्हाडी सहभागी झाल्याने त्या वधू- वराच्या वडिलांवर व मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. ५० जणांची मर्यादा पाळून शहरात मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे पार पडले. पोलीस आयुक्तालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार पाच महिन्यांत शहरात ४ हजार ११ लग्नसोहळ्यांना परवानगी देण्यात आली. विवाहप्रसंगी कार्यालयाचे भाडे, जेवण, बस्ता व सोने यावरच जास्त खर्च केला जातो. वऱ्हाडींच्या संख्येवर मर्यादा आल्याने जेवणावळीवरील खर्च थोडा कमी झाला. यामुळे ४० कोटी ते ६० कोटींदरम्यान उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
चालू महिन्यातील लग्नतारखा ढकलल्या पुढेशहरात लहान, मोठी २५० च्या जवळपास मंगल कार्यालये, लॉन आहेत. त्यातील ४० मंगल कार्यालये संघटनेचे सदस्य आहेत. ‘ब्रेक द चेन’ सुरू झाल्याने नियम आणखी कडक करत लग्नात २५ जणांनाच परवानगी दिली आहे. प्रत्येक मंगल कार्यालयात मार्च महिन्याच्या ४ ते ५ तारखा बुक झाल्या होत्या. या महिन्यात होणारे २०० पेक्षा अधिक लग्नसोहळे रद्द करण्यात आले व तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.-प्रशांत शेळके,अध्यक्ष, मंगल कार्यालय संघटना
४७० जणांनी केले रजिस्टर्ड मॅरेजकोरोनाचा संसर्ग वाढत असताना वऱ्हाडी बोलविण्यापेक्षा सह दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीविवाह करण्याचा निर्णय काही वधू- वरांनी घेतला. मागील वर्षभरात ४७० जणांनी नोंदणी विवाह केल्याची माहिती विवाह अधिकाऱ्यांनी दिली.
वर्षभरात ६१ लग्नतिथीपंचांगानुसार वर्षभरात ६१ लग्नतिथी दिल्या आहेत. एप्रिल ते जुलै यादरम्यान ३२, तर नोहेंबर २०२१ ते मार्च २०२२ यादरम्यान २९ लग्नतिथी आहेत.