विजय मुंडे उस्मानाबादशहरासह जिल्ह्यातील सहा ठिकाणी सुरू असलेल्या एमआयडीसीमधील ७११ भूखंडाचे उद्योगासाठी वाटप करण्यात आले आहे़ मात्र, यातील केवळ २०७ ठिकाणी उद्योग सुरू असून, २३ उद्योग बंद पडले आहेत़ तर तब्बल ४०८ प्लॉट संबंधितांनी नावावर करून घेतले असले तरी उद्योग मात्र, कागदावरच असल्याचे चित्र आहे़ परिणामी जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न कायम असून, अनेक युवकांना रोजगारासाठी मुंबई-पुण्याची वाट धरावी लागत आहे़एखाद्या शहराची प्रगती ही तेथील उद्योग- व्यवसायावर अवलंबून असते़ आर्थिक उलाढाल वाढावी, बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी उस्मानाबाद शहरासह उमरगा, कळंब, भूम परिसरात औद्योगिक विकास महामंडळाने जागा संपादीत केली़ उस्मानाबाद परिसरात जवळपास तीन ठिकाणी एमआयडीसीसाठी जागा संपादीत आहे़ उस्मानाबाद येथील औद्योगिक क्षेत्रातील १०१़९६ क्षेत्रावर २५८ भूखंड पाडण्यात आले आहेत़ यातील २४० प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे़ यातील १३५ भूखंडावर उत्पादन सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे़ तर २३ उद्योग बंद पडले आहेत़ अतिरिक्त उस्मानाबाद औद्योगिक क्षेत्रातील ५५़२ क्षेत्रावर ३८ भूखंड पाडण्यात आले आहेत़ यातील ३५ भूखंडाचे वाटप करण्यात आले यातील दोन भूखंडावर उत्पादन सुरू आहे़ येथील ६० एकरचे दोन भूखंड विद्यापीठ उपकेंद्रास देण्यात आले आहेत़ उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव शिवारात तब्बल १७३़७४ हेक्टर क्षेत्र हे एमआयडीसीसाठी संपादीत करण्यात आले आहे़ यावर तीन भूखंड करून त्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे़ मात्र, एकाही भूखंडावर उत्पादन सुरू नाही़ एकूणच जिल्ह्यातील उमरगा येथे औद्योगिक विकास महामंडळाने तब्बल २१०़५० हेक्टर क्षेत्र संपादीत केले आहे़ यावर ३५४ भूखंड पाडण्यात आले असून, ३२९ भूखंड वाटप करण्यात आले आहेत़ वाटप करण्यात आलेल्या ३२९ पैकी केवळ ५० भूखंडावर उद्योग सुरू आहेत़ कळंब येथे एमआयडीसीसाठी १०़१९ हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे़ यावर ४७ भूखंड पाडण्यात आले आहेत तर ४६ भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे़ वाटप केल ेल्या ४६ पैकी केवळ १८ भूखंडावर उद्योग सुरू आहेत़ भूम येथे महामंडळाने १५़५४ हेक्टर क्षेत्र संपादीत करून ६४ भूखंड पाडले आहेत़ तर यातील ५८ भूखंडाचे उद्योगासाठी वाटप करण्यात आले आहे़मात्र, ५८ पैकी केवळ २ भूखंडावर उत्पादन सुरू आहे़ जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रासाठी संपादीत क्षेत्राचे ७६४ प्लॉट पाडून त्यातील ७११ प्लॉटचे उद्योगासाठी वाटप करण्यात आले होते़ या ७११ पैकी केवळ २०७ प्लॉटवर उद्योग सुरू आहेत़ उस्मानाबाद येथील २३ उद्योग बंद पडले आहे़ उर्वरित जवळपास ४८१ प्लॉटवरील उद्योग केवळ कागदावरच राहिले आहेत़
४०८ ‘प्लॉट’ नावावर, अन् उद्योग कागदावर !
By admin | Published: April 29, 2017 12:46 AM