लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवेकनगर येथील दत्तात्रय महाजन आलेवाड यांच्या घरात चोरी करणाऱ्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. आतापर्यंत या आरोपींनी नांदेड ग्रामीण, विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक चोरीची कबुली दिली़ या आरोपींकडून ४१ मोबाईल जप्त करण्यात आले असून आतापर्यंत एकूण ५ लाख ६० हजार ७०० रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे़विवेकनगर येथील दत्तात्रय आलेवाड हे घरात उकाडा जाणवत असल्यामुळे घराचे पाठीमागील दार उघडे ठेवून झोपले होते़ यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातील ३ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास केला होता़ या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि चंद्रकांत पवार यांचे पथक नियुक्त करण्यात आले होते़ पोउपनि पवार यांनी सातव्या दिवशी आरोपी संजू किशन गुडमलवार (रा़ दत्तनगर) या आरोपीच्या मुसक्या आवळल्या़ पोलीस कोठडीत गुडमलवार याने आपल्या अन्य दोन साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली़ त्यावरुन जान्हवी सुमित लांडगे व शाहरुख खान मुनीर खान या दोघांना ताब्यात घेण्यात आले़ या तिघांनी आलेवाड यांच्या घरी चोरीची कबुली दिली़ पोलिसांनी या प्रकरणात खोलवर तपास केला असता, आरोपींनी भाग्यनगरसह नांदेड ग्रामीण, विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतही चोऱ्या केल्याचे पोलिसांना सांगितले़ सदरील चोरटे हे अट्टल गुन्हेगार असून पोलिसांना त्यांच्यामार्फत काही गुन्हेगारांची माहिती हाती लागली़ त्यावरुन पोउपनि चंद्रकांत पवार, पोकॉ़ वैजनाथ पाटील, सचिन गायकवाड, बालाजी सातपुते, विलास कदम यांनी चिखलवाडी कॉर्नर भागातून दोघांना उचलले़ त्यांच्याकडून यावेळी १९ मोबाईल जप्त करण्यात आले़ आरोपी संजू गुडमलवार याच्या साथीदाराकडून आतापर्यंत २ लाख ८१ हजारांचे सोन्याचे दागिने, १ लाख ८९ हजारांचे मोबाईल, दुचाकी यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
चोरट्यांकडून ४१ मोबाईल जप्त
By admin | Published: June 29, 2017 12:23 AM