हिंगोली : पाणी नसणे, दुरुस्ती अथवा इतर कारणांनी जिल्ह्यातील ४८८२ पैकी ४१८ हातपंप कायमचे बंद पडले आहेत. तर १६४ पैकी तब्बल ७0 वीजपंपांचीही अशीच अवस्था झाली आहे.हिंगोली जिल्ह्यात एकूण ४८८२ हातपंप आहेत. यात हिंगोली-८८२, वसमत-११९0, औंढा-७९२, कळमनुरी-११५३, सेनगाव-८६५ असे चित्र आहे. यापैकी हिंगोली- १२३, वसमत-४२, औंढा-३७, कळमनुरी-१३४, सेनगाव-८२ असे एकूण ४१८ हातपंप कायमचे बंद आहेत. वीजपंपांमध्ये हिंगोलीत ३२ पैकी १९, वसमत-४0 पैकी ११, औंढ्यात ३३ पैकी ५, कळमनुरी-२७ पैकी २४ तर सेनगावात ३२ पैकी ११ कायमचे बंद आहेत. जवळपास निम्मे वीजपंप कायमचे बंद पडले आहेत. गत महिन्यांत ३६४ हातपंप नादुरुस्त झाले होते. त्यापैकी २७५ दुरुस्त करण्यात आल्याचा अहवाल यांत्रिकी विभागाने दिला आहे. तर ४ वीजपंपही दुरुस्त केल्याचे म्हटले आहे. अजून ८९ हातपंपांची दुरुस्ती बाकी आहे. यात हिंगोली-९, वसमत-१९, कळमनुरी-३५, औंढा-२१, सेनगाव ५ अशी तालुकानिहाय संख्या आहे. हातपंप दुरुस्तीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्याने मध्यंतरी दुरुस्तीची कामे ठप्प होती. मात्र तो प्रश्न सुटल्यानंतर हातपंप दुरुस्तीच्या कामांना गती आली आहे. अनेक ठिकाणी आता हातपंप कोरडे पडत आहेत. मात्र अशा हातपंपांची नोंद कुठेही घेण्यात आली नाही. कोट्यवधी थकले : कागदी अहवालावर भरहातपंप व वीजपंप दुरुस्तीच्या वर्गणीची १.९६ कोटींची जुनीच थकबाकी आहे. त्यात चालू वर्षातील ५७ लाखांची भर पडली आहे. त्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. फेब्रुवारी माहिन्यात यापैकी हिंगोली-२ हजार, वसमत-३ लाख ११ हजार, औंढा-२ लाख ५४ हजार,कळमनुरी ६ हजार अशी एकूण ५.७३ हजारांची वसुली झाली आहे. त्यामुळे ही वसुली वाढविण्यासाठीही पंचायत समित्यांना प्रयत्न करावा लागणार आहे. हे आकडे केवळ कागदोपत्री अहवालांचा भाग बनता कामा नये. परंतु केवळ टंचाईतच हातपंप व त्याच्या दुरुस्तीची आठवण होते.हातपंप नादुरुस्त राहण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र प्रत्यक्षात त्याच्या नोंदीच होत नाहीत. ग्रामसेवकांनी नोंद केली तरच ते कळणे शक्य होते. मात्र तसे होत नसल्याने केवळ होणाऱ्या नोंदींच्या आधारेच अतिशय कमी प्रमाणात हातपंप नादुरुस्त असल्याचे सांगितले जाते.
४१८ हातपंप कायमचे बंद
By admin | Published: March 17, 2016 11:50 PM