लातूर : नुकतेच उदगीर येथे एका अल्पवयीन मुलाने मित्रांच्या साह्याने जन्मदात्या आईचीच हत्या केली़ या घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी ‘लोकमत’ने ‘पालक - बालक’ या विषयावर सर्व्हेक्षण केले असता आजही ४२ टक्के पालक आपल्या पाल्यांच्या मित्रांबाबत अनभिज्ञ असल्याची बाब समोर आली आहे़उदगीर घटनेमुळे कुंटुबातील पालक व बालक यांच्यातील संवाद, नातेसंबंध यावर प्रकाश टाकण्याचा ‘लोकमत’ ने प्रयत्न केला़ काही प्रश्न घेवून पालकांना गाठले असता काही तथ्य समोर आली़ ६० टक्के पालकांनी आपल्या मुलाकडे मोबाईल असल्याचे सांगितले़ पण ज्या पाल्याकडे मोबाईल नाहीत ते आपल्या आई- वडिलांचे मोबाईल गरजे नुसार वापरत असल्याचेही पालकांनी सांगितले़ ज्या ६० टक्के पाल्यांकडे मोबाईल आहेत त्यातील २४ टक्के पालक मोबाईलवर पाल्य काय बघतो हे तपासतो असे सांंगितले़ ३६ टक्के पालक पाल्याचे मोबाईलचा वापर कशासाठी होतो हे पाहात नसल्याची बाब समोर आली़ मोबाईल सोबतच पाल्य टीव्ही किती वेळ पाहतो असा प्रश्न विचारला असता़ ५४ टक्के बालके हे २ तास, १८ टक्के बालके ४ तास, तर २८ टक्के बालके ही ४ तासापेक्षा जास्त वेळ टीव्ही बघत असल्याचे सांगितले़पाल्यांच्या इच्छेखातर पालक आता मुलांना स्मार्टफोन घेवून देत आहेत़ या स्मार्टफोनमध्ये आणि टिव्ही पाहण्यात मुले गुंग झाली आहेत़ शाळा, महाविद्यालय आणि घरामध्ये पाहावे तेव्हा मुलांच्या हातात मोबाईल असतो़ परिणामी ही मुले मैदानी खेळापासून दुरावली आहेत़ त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावरही होत आहे़ ऐवढेच नव्हे तर आत्मकेंद्री होत असून, दुसऱ्यांशी संवाद साधण्यास टाळत आहेत़ त्यामुळे मुलांचा अबोला वाढला आहे़ बाहेरच्यांशीच नव्हे तर कुटुंबातील आई - वडील, भाऊ, बहिणींशी मुलांचा संवाद कमी होत आहे़
४२ टक्के पालक अनभिज्ञच
By admin | Published: June 05, 2016 12:22 AM