औरंगाबाद : शहरातील रुग्णालये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उच्च न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय परिसरासह अन्य न्यायालये आणि शैक्षणिक संस्थांचा परिसर शांतता परिसर म्हणून राज्य शासनाने घोषित केला आहे. राज्य शासनाने सप्टेंबर महिन्यात प्रकाशित केलेल्या राजपत्रात (गॅझेट) सायलेन्स झोन अर्थात शांतता परिसर म्हणून घोषित केलेल्या ४२ ठिकाणांची यादीच प्रसिद्ध केली.
काही वाहनचालकांना विनाकारण हॉर्न वाजविण्याची सवय असते. यातील अनेक वाहनांना कर्कश हॉर्न बसविलेले असतात. ध्वनी प्रदूषणाचा त्रास रुग्णांना होतो. एवढेच नव्हे तर ज्ञानार्जन करणारे विद्यार्थी आणि शिक्षकांनाही गोंगाटामुळे अडथळा निर्माण होतो. न्यायालयीन कामकाजातही व्यत्यय येतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने शहरातील ४२ ठिकाणांना शांतता परिसर म्हणून घोषित करावीत, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. हा प्रस्ताव मान्य करून राज्य शासनाने गत महिन्यात शांतता परिसर म्हणून घोषित केलेल्या ४२ ठिकाणांच्या नावाची यादी राजपत्रात प्रकाशित केली.
यात ३० रुग्णालये, ९ शैक्षणिक संस्थांमध्ये डॉॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधि कॉलेज, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय, सेंट फ्रान्सिस शाळा परिसर, सुशीला देवी हायस्कूल, नाईक कॉलेज परिसर, मिलिंद कॉलेज, लिटल फ्लॉवर शाळा छावणी आणि जसवंतपुरा येथील मनपा शाळा परिसरा आदी संस्थांचा यात समावेश आहे.
उच्च न्यायालय परिसर, अदालत रोड आणि कोकणवाडी येथील ग्राहक मंच न्यायालय परिसराचा यात समावेश आहे, तर घाटी रुग्णालय परिसर, आमखास मैदान येथील शासकीय कर्करोग रुग्णालय, महापालिकेचा जकातनाका येथील दवाखाना परिसर, रोशनगेट येथील मनपा दवाखान्यासह, धूत हॉस्पिटल परिसर, राज्य कामगार विमा रुग्णालय चिकलठाणा आदींसह अन्य खाजगी रुग्णालयांचा यात समावेश आहे. या परिसरात नागरिकांना वाद्य मिरवणूक काढणे, लाऊडस्पीकर वाजविणे, वाहनांचा हॉर्न वाजविण्यास मनाई करण्यात येणार आहे.