छत्रपती संभाजीनगर : मुंबईच्या घाटकोपर भागात सोमवारी वादळी वाऱ्याने होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खडबडून जाग्या झाल्या. मंगळवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मालमत्ता विभागाने शहरात किती होर्डिंग्ज कोणाचे, स्ट्रक्चरल ऑडिट झाले का?, याची माहिती घेणे सुरू केले. धक्कादायक बाब म्हणजे मनपाने होर्डिंग पॉलिसीचे धोरण २००५ मध्ये स्वीकारले. २१ वर्षांत एकदाही मनपाने स्वत:हून स्ट्रक्चरल ऑडिट केलेले नाही. एजन्सीधारक दर दोन वर्षांनी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर करतात. त्यावरच मनपा समाधान मानते.
शहरात १४ वेगवेगळ्या एजन्सीधारकांनी कोट्यवधी रुपये खर्च करून होर्डिंगसाठी ४०० पेक्षा अधिक लोखंडी स्ट्रक्चर उभारले आहेत. होर्डिंग कोठे असावे, याचे साधे निकष कुठेही पाळण्यात आलेले नाहीत. सेव्हन हिल येथे जवळपास ८० फूट लांब ४० फूट उंच होर्डिंग चक्क फूटपाथच्या बाजूला उभारले आहे. हे होर्डिंग वादळी वाऱ्याने कोसळले, तर सिग्नलवर उभ्या राहणाऱ्या शेकडो निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागू शकतो. एजन्सीधारकांनी मनात येईल, त्या जागेवर होर्डिंग उभारल्याचे चित्र शहरात पाहायला मिळते. दिवसेंदिवस होर्डिंगची संख्याही झपाट्याने वाढू लागली. त्यात २५ ते ३० अनधिकृत होर्डिंग्जही आहेत. प्रत्येक ठिकाणी मात्र, सुरक्षेचे निकष पायदळी तुडविण्यात आलेले आहेत. एकीकडे होर्डिंगची संख्या वाढत असताना, खासगी इमारतींवर होर्डिंग उभारणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढू लागली. मनपा इमारत मालकाकडून स्ट्रक्चरल ऑडिट प्रमाणपत्र घेते. आठपेक्षा अधिक खासगी इमारतींवर मोठे होर्डिंग उभारले आहेत.
स्ट्रक्चरल ऑडिटचा निर्णयदर दोन वर्षांनी एजन्सीधारकांकडून मनपा स्ट्रक्चरल ऑडिटचे प्रमाणपत्र घेते. मार्च महिन्यात सर्व एजन्सीधारकांना स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अन्यथा जबाबदारी तुमची, अशा आशयाची नोटीससुद्धा देण्यात आली. मंगळवारी पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिटचा निर्णय अत्यंत गांभीर्याने घेण्यात आला. मुंबईतील घटना खूपच दुर्दैवी आहे. शहरात मनपा प्रत्येक होर्डिंगची तपासणी करणार आहे. धोकादायक होर्डिंग आढळले, तर त्वरित काढले जाईल.- अपर्णा थेटे, उपायुक्त, मनपा.