छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीनिमित्त लाडक्या विठोबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून हजारो दिंड्या पंढरपूरला जात आहेत. मात्र, पंढरपूरला वारीसाठी ४२३ वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातून पहिली दिंडी काढण्याचा मान संत एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराजांना जातो. या दिंडीच्या परंपरेला यंदा ४२४ वर्षे पूर्ण होत आहेत. पैठण येथून शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांची पादुका दिंडी पंढरपूरला प्रस्थान झाली आणि त्यापाठोपाठ जिल्ह्यातील ७० लहान-मोठ्या दिंड्यांतील हजारो भाविकांची पावले पंढरपूरच्या दिशेने वेगाने पडत आहेत. श्रीक्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांत तिसरा मान पैठणच्या दिंडीला असतो. शनिवारी ही दिंडी वाजत-गाजत पंढरपूरला निघाली. याच दिंडीत जिल्हाभरातून आलेल्या आणखी २० दिंड्या सहभागी झाल्या आहेत.
पंढरपुरात विठ्ठलाची मूर्ती आली भानुदास महाराजांमुळे. विजयनगरचा राजा कृष्णराय यांनी विठ्ठलाची मूर्ती पंढरपुराहून आपल्या राजधानीत नेली होती. संत एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज यांनी विजयनगरला जाऊन तिथून विठ्ठलाची मूर्ती पुन्हा पंढरपुरात आणली व मंदिरात स्थापन केली. याची कथा आजही कीर्तनातून सांगितली जाते. यामुळे पैठणमधून निघणाऱ्या दिंडीला पंढरपुरात मानाचे स्थान लाभले आहे.
यंदा १४ नवीन दिंड्यांची पडली भरदरवर्षी जिल्ह्यातून ५६ दिंड्या पंढरपूरला प्रस्थान होत असतात. मात्र, यंदा आणखी नवीन १४ दिंड्यांची भर पडली आहे. यामुळे यंदा दिंड्यांची संख्या वाढून ७० झाली आहे. जिल्ह्यातील ३५ हजारांपेक्षा अधिक भाविक या दिंड्यांद्वारे पंढरपूरच्या दिशेने पायी चालत आहेत.
जिल्ह्यातील मानाच्या दिंड्याजिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मानाची दिंडी म्हणजे पैठण येथील शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांची पादुका दिंडी होय. याशिवाय दौलताबाद येथील संत जनार्दन स्वामींची पालखी (बाबासाहेब आनंदे महाराज), गंगापूर येथील रामभाऊ राऊत महाराज (विठ्ठल आश्रम) यांची दिंडी, शिरूर येथील संत बहिणाबाई महाराज दिंडी, संत शंकरस्वामी महाराज दिंडी, देवगड येथील श्री दत्त देवस्थानची (भास्करगिरी महाराज) दिंडी यासह अन्य मानाच्या दिंड्या आहेत. त्या दरवर्षी पंढरपूर वारीत सहभागी होत असतात.
३० वर्षांत दोन वर्षीच दिंडीची परंपरा खंडितमागील ३० वर्षांपासून आम्ही नियमित आषाढी एकादशीच्या दिंडीसोबत पंढरपूरला जात आहोत. दरवर्षी श्रीविठ्ठलाचे दर्शन होते. पण कोरोना काळात सलग दोन वर्षे दिंडी परंपरा खंडित झाली होती. यामुळे विठ्ठलाचे दर्शन झाले नव्हते. मात्र, त्या काळातही आम्ही घरीच भजन, नामस्मरण करीत होतो. देहाने जरी घरी असलो तरी तेव्हा मनाने पंढरपुरातच होतो.-हभप प्रभाकर बोरसे महाराज
सर्वांत आनंदाचा क्षण१९ दिवसांचा पायी प्रवास छत्रपती संभाजीनगरातून आम्ही मागील ३८ वर्षांपासून पंढरपूरला दिंडीत जात आहोत. मधील दोन वर्षे कोरोनामुळे जाता आले नाही. १९ व्या दिवशी आम्ही पंढरपुरात पोहोचतो. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी आम्ही तिथे असतो. मंदिराबाहेर १२ ते २३ तास रांगेत उभे राहून जेव्हा विठ्ठलाचे दर्शन घडते, तो क्षण जीवनातील सर्वांत आनंदाचा ठरतो.- हरिश्चंद्र दांडगे, वारकरी