औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या ‘पेट’च्या दुसऱ्या पेपरचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये ६ हजार ३८३ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार २९९ उत्तीर्ण झाले आहेत. या पेपरचा सरासरी ६७.३५ टक्के निकाल लागला आहे. ‘पेट’सह नेट-सेट व एम.फिल. धारक विद्यार्थ्यांना २२ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान पीएच.डी.साठी ऑनलाईन नोंदणी, तर ८ एप्रिलपर्यंत विद्यापीठात ‘हार्ड कॉपी‘ जमा करता येईल.
५० गुणांचा पहिला पेपर ३० जानेवारीला झाला होता. यात ६ हजार ३८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. १३ मार्च रोजी सकाळी १० ते १ दरम्यान दुसरा पेपर घेण्यात आला. दोन्ही पेपरचा निकाल २० मार्चला लागणार आहे. त्यानंतर प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे.
रिक्त जागा व गाईडची संख्या २२ मार्चला जाहीरविद्यापीठाच्या वतीने ४५ विषयांसाठी ‘पेट‘ घेण्यात आली. त्यानुसार विषयनिहाय रिक्त जागा व गाईडची संख्या २२ मार्चल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर २६ एप्रिलपासून संशोधन व अधिमान्यता समिती (आरआरसी) बैठक होणार आहे, असे परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी कळविले आहे.
४५ विषयांत ठरलेले पात्र परीक्षार्थीया परीक्षेत सर्वाधिक ३८४ विद्यार्थी इंग्रजी विषयात पात्र ठरले असून ‘लिबरल ऑर्टस‘मध्ये केवळ दोघेच विद्यार्थी पात्र ठरले आहेत. पत्रकारिता २६, मराठी १८४, वनस्पतीशास्त्र १८७, व्यवस्थापनशास्त्र २३३, रसायनशास्त्र ३१७, वाणिज्य २०५, भौतिकशास्त्र २२०, राज्यशास्त्र १४८, संगणकशास्त्र २४०, नाट्यशास्त्र २०, अर्थशास्त्र १०९, शिक्षणशास्त्र २४०, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग ४२, इंग्रजी ३८४, पर्यावरणशास्त्र ४६, ललित कला १९, अन्न तंत्रज्ञान १८, भूगोल ९५, पुरातत्व विद्या ३, जैवरसायनशास्त्र २८, भूगर्भशास्त्र २०, हिंदी ९०, इतिहास १८७, गृहशास्त्र १६, विधी ७८, उदार कला २, ग्रंथालय शास्त्र १०२, गणित ३९, मेकॅनिकल इंजिनिअरिंग ८०, सूक्ष्मजीवशास्त्र ५६, पाली १७, औषध निर्माण शास्त्र १३७, शारीरिक शिक्षण १०८, मानसशास्त्र ५८, लोकप्रशासन ७, संस्कृत ८, सामाजिक कार्य ८५, समाजशास्त्र १०५, संख्याशास्त्र ११, फुले-डॉ.आंबेडकर विचारधारा १६, पर्यटन प्रशासन १७, ऊर्दु ३०, जल व भूमी व्यवस्थापन ५, स्त्री अभ्यास १० व प्राणीशास्त्र २३५ याप्रमाणे निकाल लागला.