हिंगोली : जिल्हा परिषद व खासगी शाळांचा वार्षिक परीक्षेचा निकाल १ मे रोजी लागला असून पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना प्रगतीपत्र वाटप करण्यात आले आहेत. २ मे पासून जिल्हा परिषद व खासगी शाळांना ४४ दिवसांची उन्हाळी सुटी मिळाली आहे. दरम्यान, शिक्षण विभागातील कर्मचारी व अधिकारी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गतची कामे करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी डी. आर. चवणे यांनी दिली आहे.जिल्हा परिषद व खाजगी माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांसाठी २०१६-१७ चालू शैक्षणिक वर्षातील सुट्यांचे शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना २ मे ते १४ जूनपर्यंत सुट्या आहेत. त्यानंतर १५ जून म्हणजेच बुधवारपासून नियमित वेळेत शाळा उघडण्यात येणार आहेत. सुट्या लागल्याने बच्चे कंपनीत आनंदाचे वातावरण आहे. शिवाय मौजमजा करण्यासाठी त्यांना ४४ दिवसांच्या सुट्या मिळाल्या आहेत. जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक/माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य तसेच सर्व मुख्याध्यापकांना सुट्याबाबत परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. शिक्षण विभागाकडून दिवाळीच्या सुट्यांचेही नियोजन करण्यात आले असून २८ आॅक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०१६ पर्यंत सुट्ट्या देण्यात येणार आहेत. परंतु १३ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने व १४ रोजी गुरूनानक यांची जयंती असल्यामुळे १५ नोव्हेंबरपासून नियमित शाळा सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. या कालावधीत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रची कामे सुरू असणार आहेत. (प्रतिनिधी)
यंदा ४४ दिवस उन्हाळी सुटी
By admin | Published: May 03, 2016 12:59 AM