छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहरात घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागातील आठ जिल्ह्यांची झोळी ४५ हजार कोटींनी भरण्याची घोषणा केली. या पॅकेजच्या घोषणेवर सरकार काम करील असे मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी (दि.२३) येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीला नऊ महिने झाले असून, अंमलबजावणी कधी होणार, याचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले होते.
घोषणेचा अध्यादेश काढण्याशिवाय काहीही तरतूद शासनाने केलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत या पॅकेजचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना देखील विसर पडला. स्थानिक पातळीवरूनही काही हालचाली नसल्यामुळे या पॅकेजमधील कामांना मुहूर्त कधी लागणार? नऊ महिने झाले मंत्रिमंडळ बैठकीला, आजवर त्यावर काय निर्णय घेतले, यावर मुख्यमंत्री संतापून म्हणाले, मग काय आचारसंहितेत निर्णय घ्यायचा काय, सरकारने मराठवाड्यासाठी ‘एनडीआरएफ’, ‘एसडीआरएफ’चे नियम बदलले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मानधन सुरू केले. मंत्रिमंडळ बैठकीतील घोषणांवर आम्ही काम करणार आहोत. येथील पाणीपुरवठा योजनेचे काम शासनच करीत आहे. पीकविमा योजनेसाठी सरकार काम करीत नाही का, यात लापरवाही करणाऱ्यावर कारवाई केली जाईल. मराठवाडा वॉटरग्रीडसाठी पंतप्रधानांना बोललो आहोत. भीमा स्थिरीकरण योजनेचे काम करतो आहोत. मराठवाड्याला पाण्यापासून वंचित ठेवणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पालकमंत्री नसले तरी मैं हूँ ना...मराठवाड्यातील दोन वगळता उर्वरित पालकमंत्री बैठकीला का नव्हते, काही पालकमंत्री उमेदवार आहेत. त्यामुळे ते आले नाहीत. ते नसले तरी मैं हूँ ना, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच विरोधक टंचाईवर सध्या काहीही बोलत नाहीत. यावर बोलतांना शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना साेडून मला लंडनला (विरोधकांचे नाव न घेता) कसे जाता येईल. काही लोक फक्त निवडणुका व मतदानापुरतेच असतात अशी टीका करून सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे १७०० कोटी देखील सरकार देणार असल्याचे ते म्हणाले.
‘त्या’ कंपन्या अंबरनाथमध्ये हलवू...डोंबिवलीतील एका कंपनीत झालेल्या स्फोटामुळे आठ जणांचे मृत्यू झाले आहेत. तेथे मदतकार्य सुरू असून, प्रशासन, लोकप्रतिनिधी तेथे आहेत. एमआयडीसी आधी झाली, मग कंपन्या आल्या. नंतर वसाहती झाल्या. घातक रसायन उत्पादनांमुळे ब्लास्ट होऊ शकतात. अशा कंपन्यांना अंबरनाथ सेक्टरमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेत आहोत. यासाठी संबंधित खात्यांशी चर्चा सुरू आहे.
कीर्तिकरांबाबत पक्ष निर्णय घेईल...गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई करणार आहात का? या प्रश्नावर ते म्हणाले, कीर्तिकर यांच्याची माझे बोलणे झाले आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याबाबत काय निर्णय घ्यायचा असेल तर पक्ष घेईल.