औरंगाबाद : महापालिका ब्लॅकलिस्ट कंत्राटदारांना १२५ कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे देत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने बुधवारी ४७ कोटी रुपयांची कामे स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. उर्वरित कामांच्या अनुषंगाने कंत्राटदारांची सखोल चौकशी झाल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिली.
महापालिका कोणत्याही नियमांच्या बाहेर जाऊन काम करणार नाही. आम्ही ताकही फुंकून पीत आहोत. प्रशासनाकडून अत्यंत पारदर्शकपणे सर्व निविदांची छाननी सुरू असल्याचे महापौरांनी नमूद केले. जेएनआय आणि मस्कट कन्स्ट्रक्शन यांना नोटीस दिली आहे. त्यांचा खुलासा आल्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. रस्त्यांच्या कामासाठी कंत्राटदारांना विनंती केल्यावर सर्वजण अंदाजपत्रकीय दराने काम करण्यास तयार झाले आहेत, प्रशासनाचे हे मोठे यश असल्याचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आम्ही प्राप्त निविदांच्या कंत्राटदारांकडे खातरजमा करतोय.
पी-४ या निविदा प्रक्रियेत एकूण १२ रस्त्यांचा समावेश आहे. राजेश कन्स्ट्रक्शनने हे काम मिळविले असून, या कामांची किंमत २२ कोटी ५८ लाख रुपये आहे. या निविदा अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात येतील. मकईगेट ते बीबीका मकबरा, निराला बाजार ते महापालिका मुख्यालय व्हाया खडकेश्वर, संताजी पोलीस चौकी ते गंगासागर सोसायटी व्हाया नक्षत्रवाडी जलकुंभ, ईटखेडा महापालिका शाळा ते नाथव्हॅली शाळा, हर्सूल वॉर्ड क्रमांक १ मध्ये विविध कामे, पानदरिबा येथील व्हीआयपी स्टोअर- औरंगाबाद बुक डेपो ते शनिमंदिर अंगुरीबाग,सिद्धार्थ चौक ते ताज हॉटेल, विजय चौक ते कालिमाता मंदिर ते ताज कॉर्नर, आझाद चौक ते बजरंग चौक, सिटीचौक ते पैठणगेट, माता रमाई आंबेडकर गेट ते गंगा बावडी, माऊली चौक ते एटीएम रोड, नंदनवन कॉलनी, शहागंज चमन ते निजामोद्दीन चौक या १२ रस्त्यांचा समावेश आहे.
१८ रस्त्यांची कामे सुरू होणारपी-२ या निविदेत एकूण सहा रस्त्यांचा समावेश आहे. हे काम जे. पी. इंटरप्रायजेसने मिळविले आहे. अंदाजपत्रकीय दरानुसार २४ कोटी ५२ लाख रुपये या कामावर खर्च होणार आहेत. सोहम मोटर्स जालना रोड ते महालक्ष्मी चौक, शाहूनगर (रामनगर) ते मौर्य मंगल कार्यालय एन- १२ सिडको स्कीम व्हाया विश्रांतीनगर आणि सदाशिवनगर, कामगार चौक ते हायकोर्ट, धूत रुग्णालय ते मुर्तूजापूर, अहिल्यादेवी होळकर चौक ते रेल्वे ट्रॅक विश्रांतीनगर, जानकी हॉटेल ते मेहरसिंग नाईक हायस्कूल या सहा रस्त्यांचा समावेश आहे.