औरंगाबाद : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैधरित्या दारु विक्री आणि मद्य सेवन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या ढाब्यांवर कारवाईचा बडगा उगारत आरोपींच्या विरोधात विविध सत्र न्यायालयात दोषरोपपत्र सादर केले. एकुण आठ ढाब्यांच्या मालकांसह ४७ मद्यापींना २ लाख ३० हजार रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.
वाळूज येथील 'हॉटेल राजनंदिनी ढाबा' येथे मारलेल्या छाप्यात मालक शंकर सजन पारधे यांच्यासह ७ मद्यपींना पकडले. या आरोपींना गंगापुर प्रथमवर्ग न्यायालयाने मालकास २५ हजार व प्रति मद्यापींना ५०० रुपये असा एकुण २८ हजार ५०० रुपये दंड ठोठावला. हिरापुरा शिवारातील 'हॉटेल वन ॲण्ड वन' ठिकाणी मारलेल्या छाप्यात मालक दीपक लोकडिबा मोरे (रा. मुकुंदवाडी, एन २ सिडको) याच्यासह ४ मद्यपींना पकडले.
त्यांना सत्र न्यायालयाने ३७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. पैठण रोडवरील 'हॉटेल गोदावरी' याठिकाणी दुय्यम निरीक्षक शिवराज वाघमारे यांनी मारलेल्या छाप्यात चालक मेहमुद कासम पठाण (रा. सादात चौक, बीडकीन) याच्यासह चार मद्यपींना पकडले. पाच आरोपींना पैठण येथील प्रथमवर्ग न्यायालयाने २७ हजार रुपयांचा दंड केला. सातारा परिसरातील 'हॉटेल साई स्वराज ढाबा' व 'हाॅटेल दरबार ढाबा' याठिकाणी छापा मारुन मालक कुमार तातेराव गायकवाड (रा. एन६, सिडको), किरण देविदास तुलसे (रा. यशवंतरनगर, सातारा परिसर) या दोघांसह ९ मद्यपींना पकडले.
या ११ जणांना सत्र न्यायालयाने ५४ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. फुलंब्री ते खुलताबाद रोडवरील 'हॉटेल राहुल ढाबा' याठिकाणी मारलेल्या छाप्यात मालक गोकुळ रामचंद्र जाधव (रा. खुलताबाद) यांच्यासह ४ मद्यापींना पकडले. पाच जणांना खुलताबाद न्यायालयाने २७ हजार रुपये दंड करण्यात आला. पुंडलिकनगर रोडवरील हॉटेल गौरव मराठाच्या मालकासह आठ मद्यपींना २८ हजार ५०० रुपये आणि बीड बायपास रोडवरील हॉटेल चालकासह चार मद्यपींना २७ हजार रुपयांचा दंड सत्र न्यायालयाने केला. असा एकुण आठ कारवायांमध्ये ४७ आरोपींना २ लाख ३० हजार रुपयांचा दंड न्यायालयाने केल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.
यांनी घेतला कारवाईत भाग
ढाब्यांवरील कारवाईत अधीक्षक झगडे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक प्रविण पोटे, संजय तवसाळकर, निरीक्षक ए.जे. कुरेशी, राहुल गुरव, शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक शिवराज वाघमारे, गणेश पवार, भारत दौंड, सुनील कांबळे, एस.डी. मराठे, एस.डी. घुले, एस.एस. पाटील, एम.पी. पवार, जी.बी. इंगळे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे पाटील, अनंत शेंदरकर, नवनाथ घुगे, सुभाष गुंजाळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी नोंदवला.