औरंगाबाद: दरमहा सात टक्के दराने परतावा देण्याचे अमिष दाखवून १२ जणांची ४७ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी विजयनगर येथील कॅपीटल ग्रोथ कंपनीच्या दोन संचालकाविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा नोंदविण्यात आला. आर्थिक गुन्हेशाखा याप्रकरणाचा तपास करीत असून आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला.
रत्नेश प्रभाकरराव हस्तक(वय ५७,रा. एन-९, एम-२,ज्ञानेश्वरनगर, हडको) आणि अजय अशोक जोशी (रा. ब्रीजवाडी)अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना आर्थिक गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उल्कानगरी येथील रहिवासी प्रवीण प्रभाकरराव हस्तक हे अॅटोमोबॉईल गॅरेज चालवितात. २०१५ मध्ये त्यांच्या ओळखीच्या एका जणाने त्यांना सांगितले होते, तुम्हाला गुंतवणुक करायची असेल तर विजयनगर येथील ग्रोथ कॅपीटल या कंपनीत कर, ते चांगला परतावा देतात. त्यामुळे तक्रारदार यांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन गुंतवणुक योजनेविषयी माहिती जाणून घेतली. त्यावेळी आरोपींनी त्यांना गुंतविलेल्या रक्कमेवर दरमहा सात टक्के दराने अठरा महिने व्याज देतो. त्यानंतर तुम्हाला तुमची रक्कम परत करतो,असे सांगितले.
विशेष म्हणजे हे व्याज दरमहा तुमच्या बँक खात्यात जमा केल्या जाईल असे नमूद के ले. रक्कम परत करण्यासाठी पुढील तारखेचा धनादेशही आगाऊ प्रदान करतो,असे सांगितल्याने तक्रारदार यांनी आरोपीच्या कंपनीत ३लाख रुपये भरले. त्यांच्याप्रमाणेच दिलीप भिमराव निकम, धन्वंतरी निकम, शांताराम पाटील, चंद्र्रनील परब,गणेश वाघमारे, भीमराव शेणफडू पाटील, चंद्रकांत विक्रम पाटील, योगिनी भामरे, पराग रत्नपारखी, मिलिंद मुळे, विजय धोटे यांच्यासह इतरांकडून वेगवेगळ्या असे एकूण ४४ लाख रुपये त्यांनी घेतले.
प्रवीण यांच्याप्रमाणे अन्य एकाही तक्रारदाराच्या बँक खात्यात आरोपींनी एक रुपयाही जमा केला नाही. यामुळे तक्रारदार यांनी आरोपींना भेटून व्याजाच्या रक्कमेची वेळोवेळी मागणी केली असता प्रत्येक वेळी ते वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेत. दरम्यान मुदत संपल्यानंतरही आरोपींनी व्याज न दिल्याने तक्रारदार यांनी त्यांना मुद्दल रक्कमेची मागणी केली. तेव्हा त्यांनी मुद्दल देण्यासही नकार दिला.