छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात रविवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत झालेल्या अवकाळी पावसाचा ४७ हजार हेक्टरवरील जिरायती, बागायती पिकांसह फळबागांना फटका बसला आहे. ५९८ गावे या पावसाने बाधित झाली असून सर्वाधिक नुकसान बागायती क्षेत्राचे झाल्याचे विभागीय प्रशासनाने प्राथमिक अहवालाच्या आधारे म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड या तीन जिल्ह्यांतील पिकांचे जास्तीचे नुकसान झाले आहे. उर्वरित जिल्ह्यांनाही कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर सर्व मिळून १७५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. २४ घरांची अंशत: पडझड झाली. इतर १४ व ८ गोठ्यांचे पावसाने नुकसान केले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिरायती २१ हजार ३४९, बागायती २४ हजार ७८९ तर ६४ हेक्टर फळबागांचे नुकसान झाले. जिल्ह्यात ४६ हजार २०२ हेक्टरवरील पिकांची पावसाने माती केली.
परभणी जिल्ह्यात जिरायती ५३३, बागायती ६६, फळबागा ९३ हेक्टर तर बीड जिल्ह्यात जिरायती २१५ हेक्टरचे पीक वाया गेले. पुढील दोन दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे नुकसानीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
ती मदत ऑनलाईनच्या फेऱ्यात...मराठवाड्यात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले. ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपयांचा मदतनिधी मिळावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली, अद्याप ती मदत ऑनलाईनच्या फेऱ्यामुळे पूर्ण क्षमतेने मिळालेली नाही. विभागात ८ ते २० मार्च व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गारपिटीसह अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजार १८ शेतकऱ्यांचे ६० हजार ४०२ हेक्टर क्षेत्रातील रबी पिके, तसेच फळबागांचे नुकसान झाले. मराठवाड्यात जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी २० कोटी ९२ लाख, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी ५१ कोटी ५९ लाख, फळपिकांच्या नुकसानीसाठी १२ कोटी २३ लाख, असे सुमारे ८४ कोटी ७५ लाख ९१ हजार रुपयांची मदत प्रशासनाने मागितली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १३,५३५ हेक्टरच्या नुकसानीपोटी २२ कोटी, जालन्यात १,९६९.४९ हेक्टरसाठी साडेतीन कोटी, परभणी ३,९६०.८१ हेक्टरसाठी साडेचार कोटी, हिंगोलीत ३,८३८.७२ हेक्टरसाठी ६ कोटी , नांदेड २१,५७९.५० हेक्टरसाठी ३१ कोटी, बीड ३,८०२.०२ हेक्टरसाठी ६ कोटी, लातूर जिल्ह्यात १०,३६७.८३ हेक्टरसाठी ११ कोटी, धाराशिव १,३४९.०० हेक्टरसाठी दीड कोटी मिळून विभागातील एकूण ६०,८१९.१६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
एका दिवसात नुकसान किती ?जिरायत: २२ हजार ९७ हेक्टरबागायती: २४ हजार ८५५ हेक्टरफळबागा: १५७ हेक्टर