छत्रपती संभाजीनगर : पैठण रोडवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे. तीन ठिकाणी जलवाहिन्यांचा अडथळा येत असून, त्यासाठी महापालिका प्रशासन ४८ तासांचा शटडाऊन मंगळवारपासून घेत आहे. जलवाहिन्या स्थलांतरित करण्यात येणार असल्याने शहराला दोन दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.
नॅशनल हायवेकडून मागील काही दिवसांपासून जलवाहिन्या स्थलांतरित करण्याची मागणी मनपाकडे करण्यात येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शटडाऊन घेतले तर नागरिकांकडून ओरड होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यातच दिवाळीच्या तोंडावरही जलवाहिन्या स्थलांतरित केल्या तरी नागरिकांची नाराजी अटळ होती. त्यामुळे आता महापालिकेने शटडाऊनसाठी ग्रीन सिग्नल दिला. पैठण रस्त्याच्या रुंदीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गेवराई तांडा, कौडगाव-ताहेरपूर आणि ढोरकीन येथे शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी स्थलांतरित करण्याची विनंती केली. त्यानुसार मंगळवारी सकाळी ९:०० वाजता हे काम सुरू होणार आहे. बुधवारी रात्रीपर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. एकूण सहा ठिकाणी जलवाहिनीला क्रॉस कनेक्शन द्यावे लागणार आहे. बुधवारी रात्री किंवा गुरुवारी सकाळी शहरात पाणी येण्यास सुरुवात होईल. मनपाला जलवाहिनी चाचणी घेणे, जलवाहिनी पूर्णपणे भरण्यासाठी १२ ते १८ तासांचा वेळ लागणार आहे.
विजेचे खांबही काढणारवीज वितरण कंपनीनेदेखील १५ तास शटडाऊन देण्याची मागणी केली आहे. या काळात वीज वितरण कंपनीतर्फे रस्त्यात येणारे विजेचे खांब हटविले जाणार आहेत. नवीन खांब बसविले असून, त्यासाठी केबल टाकण्याचे काम करावे लागणार आहे. फारोळा जलशुद्धीकरण केंद्र पूर्णपणे बंद राहील.
७००, ९००चे पाणीही बंदशहराला पाणीपुरवठा करणारी ७०० आणि १२०० मिमी व्यासाची जलवाहिनीसुद्धा बंद राहणार आहे. त्यामुळे दोन दिवस शहरात एक थेंबही पाणी येणार नाही. त्यामुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागणार आहे.