रामेश्वर काकडे। लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : खादी व ग्रामोद्योग आयोग, ग्रामोद्योग मंडळ आणि जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे ५५५ पैकी ४८० प्रस्ताव विविध बँकांनी नामंजुर केले आहेत. त्यामुळे या योजनेचा उद्देश कसा पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील उद्योजकांना पाणी, वीज, वाहतुक यासह अर्थसहाय्य वेळेवर उपलब्ध होत नसल्याने त्याना अडचणींचा सामना करावा लागत आहे.ग्रामीण भागातील सुशिक्षित व गरजु बेरोजगारांना स्वंयरोजगारांची सधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच खेड्यातून शहराकडे होणारे स्थलांतर थांबविणे, ग्रामीण भागातील रोजगार वाढीस मदत व्हावी, तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. योजनेतंर्गत उत्पादन प्रक्रिया उद्योगासाठी जास्तीत जास्त २५ लाख तर व्यवसाय व सेवा उद्योगासाठी जाास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंतचे प्रकल्प भांडवल आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत सर्वसाधाराण संवर्गातील लाभार्थ्यांसाठी ग्रामीण भागासाठी २५ टक्के तर महिला व मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ३५ टक्के एवढे अनुदान आहे. त्यातील प्रकल्प किमतीच्या १० टक्के हिस्सा सर्वसाधारण लाभार्थ्यांनी स्वगुंतवणूक करावयाचा असून महिला व मागासवर्गीय लाभार्थ्यांनी ९० टक्के बँकेकडून कर्ज घ्यावयाचे आहे. नांदेड जिल्हा उद्योग केंद्रातंर्गत लघु व मध्यम स्वरुपाचे एकूण ५ हजार ८८४ उद्योग व्यवसाय जिल्हा उद्योग केंद्राकडे नोंदणीकृत आहेत. त्यात एकूण २० मोठे उद्योग आहेत. सदर उद्योगामध्ये जवळपास ३७ हजार १६१ कामगार कार्यरत आहेत. परंतु यापैकी बहुतांश उद्योग नोंदणी करुनही पाणी व विजेची समस्या तसेच बँकेकडून अर्थसहाय्य प्राप्त न झाल्यामुळे बंदावस्थेत आहेत. यावरुन अनेक लघु-मध्यम स्वरुपाच्या व्यावसायीकांनी उद्योग केंद्राकडे व्यवसायाची नोंदणी केली मात्र बँकाकडून अर्थसहाय्याचा प्रस्ताव मंजुरच होत नसल्याने वर्षानुवर्षा पासून व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमातर्गंंत २ ते २५ लाख रुपयापर्यंतचे उद्योग घेता येतात. त्यात आॅईलमिल, दालमिल, वेल्डींग वर्कशॉप, पॅकींग ड्रींकींग वॉटर, सिमेंट पोल तयार करणे, फरशी कटींग पॉलिस, डीटीपी जॉब आॅपरेटर, कंम्युटर, मंडल डेकोरेशन, क्राँक्रीट मिक्सर या प्रकारच्या व्यवसायाचा समावेश आहे. यापुर्वी उद्योग उभारण्यासाठी अधिच उद्योग केंद्राकडे संबधित उद्योगाबाबत नोंदणी केली जायची, मात्र आता उद्योगाची उभारणी केल्यानंतर त्याबाबत उद्योग केंद्राकडे नोंदणी करण्यात येते.
पंतप्रधान रोजगार निर्मितीचे ४८० प्रस्ताव नामंजूर
By admin | Published: June 22, 2017 11:28 PM