लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हवामान खात्याचा पावसाचा अंदाज, हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे. अतिवृष्टीचा इशारा देणाºया भागात काहीच पाऊस पडत नसल्याने शेतकºयांच्या मनात हवामान विभागाबाबत रोष आहे. दुसरीकडे हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी महसूल मंडळनिहाय स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येत आहे. जिल्ह्यात आठ तालुक्यांत ४९ ठिकाणी ही स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात आली आहेत.राज्यशासन व स्कॉयमेट वेदर फॉरकास्ट कंपनीच्या माध्यमातून हे स्वयंचलित यंत्र बसविण्यात आली आहेत. या वर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकºयांनी महागडे बी-बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाल्याने कापसू वगळता, मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी ही पिके वाया गेली आहेत. जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. हवामान विभागामार्फत वर्तविण्यात येणारा पावसाचा अंदाज चुकीचा ठरत आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असताना पावसाचा थेंबही पडत नसल्याने शेतकºयांमधून संताप व्यक्त केला जात आहे. हवामान विभाग व वेधशाळा विभागानुसार अंदाज जाहीर करतात. त्यामुळे अनेकदा हवामान विभागाचे अंदाज चुकतात. तसेच या पूर्वी मंडळनिहाय स्वयंचलित हवामान केंद्र नसल्याने त्या हवेचा वेग, दिशा, हवेतील आर्द्रता, पावसाची स्थिती याची अचूक महावेध पोर्टलपर्यंत पोहचत नव्हती. त्यामुळे राज्यशासनाने स्कॉयमेट फॉरकास्ट कंपनीबरोबर भागीदारी पद्धतीने स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीचा निर्णय घेतला आहे. सध्या हे काम प्रगतीपथावर आहे.
हवामान अंदाजासाठी ४९ स्वयंचलित केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:37 AM