औरंगाबाद : एसटी महामंडळात दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ४९ जण चालक तथा वाहकपदी रुजू झाले. कोरोनामुळे या सर्वांची नोकरी लटकली होती. ‘लोकमत’ने याविषयी पाठपुरावा करताच या सर्वांचे ‘एसटी’च्या सेवेत रुजू होण्याचे स्वप्न अखेर साकार झाले.
एसटी महामंडळाने २०१९ मध्ये चालक तथा वाहक पदाची भरतीप्रक्रिया राबविली. औरंगाबाद विभागात २४० जागांसाठी ही भरतीप्रक्रिया झाली. परीक्षा, वैद्यकीय तपासणीतून २१९ जणांची निवड झाली. एसटी महामंडळात रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार एकावेळी ५० ते ५५ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आणि नियुक्ती देण्यात आली. मात्र, ५४ जणांना प्रशिक्षण होऊनही नेमणूक मिळाली नाही. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यांची नेमणूक प्रक्रिया थांबली. वर्ष लोटूनही त्यांना नियुक्ती मिळाली. हा प्रकार ‘लोकमत’ने १३ फेब्रुवारी रोजी ‘एसटी महामंडळाचे प्रशिक्षण लटकले अन् नोकरीही अधांतरी’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला. या वृत्तानंतर जागे झालेल्या एसटी महामंडळाने निवड झालेल्या उमेदवारांना उजळणी प्रशिक्षणासाठी बोलावले. परंतु प्रशिक्षणानंतरही नियुक्ती रेंगाळली. याविषयीदेखील ‘लोकमत’ने २६ मार्च सविस्तर वृत्त प्रकाशित केले. अखेर एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाने युद्धपातळीवर प्रक्रिया पूर्ण करून ८ एप्रिल रोजी ४९ जणांना नियुक्तिपत्र देऊन नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्याची सूचना केली. ४९ जण रुजू झाल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.
‘लोकमत’मुळे अखेर रुजू
‘लोकमत’ने पाठपुरावा केल्यामुळे एसटीत रुजू झालो. एसटी महामंडळाने शुक्रवारी नियुक्तिपत्र दिले, असे चालक तथा वाहकपदी नेमणूक मिळालेले संजय कुकलारे म्हणाले.
फोटो ओळ...
‘लोकमत’ने १३ फेब्रुवारी रोजी प्रकाशित केलेले वृत्त.