वेरूळ : वेरूळ येथील बारावे ज्योर्तीलिंग घृष्णेश्वर महादेवास अधिक मासानिमित्त ४ ते ८ जून या दरम्यान अतिरुद्र जलाभिषेक करण्यात येणार असून या काळात गाभारा दर्शन बंद राहणार आहे. त्यामुळे ५ दिवस भाविकांना सभा मंडपातूनच दर्शन घ्यावे लागणार आहे.या कार्यक्रमाच्या तयारीसाठी मंदिर देवस्थानची नुकतीच बैठक घेण्यात येऊन नियोजन करण्यात आले. या बैठकीस देवस्थानचे अध्यक्ष दीपक शुक्ला, अतिरुद्र जलाभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष परेश पाठक, कार्यकारी विश्वस्त कमलाकर विटेकर, माजी सरपंच प्रकाश पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश उर्फ नाना ठाकरे, पोलीस पाटील रमेश ढिवरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष फुलारे, श्याम शेवाळे, सुनील विटेकर, सुरेश थोरात, गणेशसिंह हजारी, अर्जुन काळे, मंगेश पैठणकर, व्यवस्थापक संजय वैद्य, महेंद्र दगडफोडे, गणेश वैद्य, मधुकर वैद्य, सुनील शुक्ला आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.आज शंकराचार्यांची सवाद्य मिरवणूक४ जून रोजी सकाळी ८ वाजता करवीर पीठाधीश्वर शंकराचार्य नृसिंह भारती यांची वेरुळ गावातून सवाद्य मिरवणूक (शोभायात्रा) काढण्यात येणार आहे. तसेच सडा-रांगोळीने या मिरवणुकीचे स्वागत करण्यात येणार आहे. वेरूळ ग्रामस्थांसाठी ६ जूनला दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. ब्रह्मवृंदाची बैठक होऊन यंदाच्या अधिक मासामध्ये जलाभिषेक करण्याचे ठरले होते. यानंतर घृष्णेश्वर देवस्थानची बैठक होऊन त्यास संमती देण्यात आली.१९८५ मध्ये पहिला दुधाचा अतिरुद्र महाभिषेकसर्वप्रथम १९८५ मध्ये कांचीपीठ शंकराचार्य श्री श्री जयेंद्र सरस्वती यांची अनुमती घेऊन दुधाचा पहिला अतिरुद्र महाभिषेक करण्यात आला तर यंदाच्या अधिक मासातील अतिरुद्र महाभिषेक हा बारावा आहे. दरम्यान, भाविकांनी ५ दिवस सहकार्य करावे, असे आवाहन श्री घृष्णेश्वर देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
४ ते ८ जूनपर्यंत घृष्णेश्वर मंदिरात गाभारा दर्शन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:23 AM