- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने स्मार्ट शहरांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी ‘स्ट्रीट्स फॉर पिपल चॅलेंज’स्पर्धा आयोजित केली आहे. देशभरातील ११३ शहरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यातील पहिल्या ३० प्रमुख शहरांची घोषणा मंगळवारी केंद्र शासनाने केली. महाराष्ट्रातील तब्बल पाच शहरांनी यामध्ये स्थान पटकावले आहे. औरंगाबादसह नागपूर, नाशिक, पिंप्री चिंचवड, पुणे शहरांचा यामध्ये समावेश आहे.(5 cities in the state including Aurangabad in the top 30 in the 'Streets for People Challenge' competition )
केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शहरांना विविध उपक्रम आयोजित करण्यास सांगितले. ‘स्ट्रीट्स फॉर पिपल’ हा उपक्रमदेखील त्याचाच एक भाग आहे. महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या नेतृत्त्वाखाली औरंगाबाद शहराने या उपक्रमात सहभाग घेतला. क्रांती चौकातील झाशी राणी पुतळ्यासमोरील रस्त्यावर ‘स्ट्रीट्स फॉर पिपल चॅलेंज’ या उपक्रमाचे आयोजन केले.
केंद्र शासनाच्या शहरी विकास मंत्रालयाने स्ट्रीट्स फॉर पिपल चॅलेंज या उपक्रमातील स्टेज एकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पहिल्या ३० शहरांची यादी जाहीर केली. यात औरंगाबादचा समावेश आहे. पहिल्या ३० शहरांच्या यादीत औरंगाबादसह पुणे, पिंप्री चिंचवड, नाशिक व नागपूरचा समावेश आहे. इतर राज्यातील अमृतसर, बंगळुरू, भोपाळ, चंदीगड, गंगटोक, गुरुग्राम, हुबळी धारवाड, इंफाळ, इंदूर, जबलपूर, झाशी, करीमनगर, कर्नाल, कोची, कोहिमा, कोटा, कोलकोता नवीन शहरे, रायपूर, सिल्वासा, सुरत, उदयपूर, उज्जैन, वडोदरा, विजयवाडा या शहरांचा समावेश आहे.
‘स्ट्रीट्स फॉर पिपल’ योजनेचा उद्देशशहरातील काही प्रमुख रस्त्यांवर सर्वसामान्य नागरिकांना पायी फिरता यावे, बाजारपेठेत कोणत्याही वाहनाविना मुक्तपणे खरेदी करता यावी, तो परिसर प्रदूषणमुक्त ठेवणे, वयोवृद्ध नागरिकांसाठी ई-वाहने, या रस्त्यांवर वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम राबविणे, रस्त्याच्या कडेला आरामशीर बसता यावे, अशी सुविधा निर्माण करणे आदी अनेक उपक्रमांचा यात समावेश आहे.
औरंगाबादेत चार रस्त्यांची निवडक्रांती चौक ते गोपाल कल्चरल हॉल, गुलमंडी ते पैठणगेट, कॅनॉट प्लेस, एमजीएम प्रियदर्शनी उद्यान रोड स्ट्रीट्स फॉर पिपल उपक्रमासाठी निवडण्यात आले आहेत. क्रांती चौक येथे तसा रस्ताही तयार करण्यात आला आहे. कॅनॉटमध्ये काम सुरू करण्यात आले. या उपक्रमासाठी स्मार्ट सिटीने देशभरातील तज्ज्ञांकडून डिझाईन मागविले होते. त्यातील सर्वोत्कृष्ट डिझाईनची निवड करण्यात आली आहे.