औरंगाबाद : पेब शेड उभारणीचे काम करू न देण्याचे खोटे सांगून औरंगाबादेतील उद्योजकाला उत्तरप्रदेशातील दोघांनी ५ लाख ८५ हजार रुपयांची आॅनलाईन फसवणूक केली. याविषयी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
दानिश सिद्दिकी आणि परवेज सिद्दिकी अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याविषयी सायबर पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, रायगडनगर येथील रहिवासी उद्योजक सुधाकर पंढरीनाथ चामले यांचा गंगापूर तालुक्यातील अंतापुर (भेंडाळा) येथे पेट बॉटल तयार करण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या कंपनीकरीता त्यांना पेब शेड बांधायचे होते. त्यामुळे चामले यांनी इंटरनेटवर असे काम करणारे क ोणी आहेत का याचा शोध घेतला. तेव्हा उत्तरप्रदेशातील मेरठ येथील जोया इंटरप्रायजेस नावाचे फ र्म हे काम करीत असल्याचे समजले. वेबसाईटवरील मोबाईलवर चामले यांनी संपर्क साधून या कामाचे कोटेशन मागितले.
आरोपींनी त्यांना ईमेलवरून कोटेशन पाठविले. आरोपींच्या कामाचे दर आवडल्याने चामले यांनी त्यांना काम देऊ केले.तेव्हा आरोपींनी त्यांना वेगवेगळी कारणे सांगून तब्बल ५लाख ८५हजार रुपये दानिश आणि परवेज यांनी त्यांच्या बँक खात्यात जमा करवून घेतले. चामले यांनी ही रक्कम आरटीजीएसद्वारे आरोपींच्या खात्यात जमा केली. पैसे मिळाल्यानंतरही आरोपींनी काम करण्यासाठी आज येतो, उद्या येतो,असे सांगून वेळ मारून नेली. नंतर त्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक बंद करून टाकले. आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच चामले यांनी याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी गुन्हा नोंदवून पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी तपास सुरू केला.