औरंगाबाद : शहरात अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या दोन तस्करांसह लाखो रूपये किमतीचे चरस व मेफेड्रोन हे अमली पदार्थ मंगळवार दि. २९ रोजी ताब्यात घेण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने शहरातील पंचवटी चौकात ही कारवाई केली.
मुंबई येथून एक स्कॉर्पिओ वाहनातून औरंगाबादेत अमली पदार्थांची तस्करी होत असून मंगळवारी सकाळी हे वाहन शहरात येणार आहे, अशी माहिती सकाळी ६ च्या सुमारास आयुक्तांचे लेखनिक सहायक निरीक्षक राहुल रोडे यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार रोडे यांनी सिटीचौक ठाण्याचे सहायक निरीक्षक सय्यद मोहसीन, वेदांत नगर ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर रोडगे, उपनिरीक्षक भदरगे यांनी पोलिसांचा फौजफाटा, तसेच फॉरेन्सिक विभाग, अन्न व औषधी नियंत्रण विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचवटी चौकात सापळा रचला. स्कॉर्पिओ एमएच- २०, एआर- ०००२ अडवून झडती घेतली असता त्या गाडीत २५ ग्रॅम चरस, आणि मेफोड्रोन नावाचा १० ग्रॅम अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी अमली पदार्थ जप्त करून आशिक अली मुसा कुरेशी आणि नौरोद्दीन बद्रोद्दीन सय्यद या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांना सापडलेल्या मेफेड्रोनची किंमत ५२ हजार रूपये असून चरस ११, २०० रूपये किमतीचे आहे. यासह पोलिसांनी आरोपींकडील रोख रक्कम, दोन मोबाईल व स्कॉर्पिओ असा एकूण ५ लाख ९९ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमली पदार्थांची तस्करी करणारे स्कॉर्पिओ हे वाहन कलीम कुरेशी यांचे असून त्यावर औरंगाबाद महापालिका सदस्य असे स्टीकर लावण्यात आले आहे. हे वाहन शहरातील माजी नगरसेविका वापरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.