लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहराला लागून असलेल्या जटवाडा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेसह पाच शिक्षकांना आज मंगळवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार सदरील शाळेची ढासळलेली गुणवत्ता, घटलेली विद्यार्थी संख्या व शिक्षकांच्या बेकायदेशीर गैरहजेरीसंबंधी स्वत: खातरजमा केल्यानंतर आज हा निर्णय घेतला.जटवाडा जि.प. शाळेतील निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये मुख्याध्यापिका विद्या रामसिंग जाधव, सहशिक्षक संजय सांगळे, सुनीता विटेकर, यास्मीन शमशोद्दीन शेख आणि सतीश पाटील यांचा समावेश आहे. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी १५ नोव्हेंबर रोजी जटवाडा येथील आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबाला भेट दिली. तेथून ते परत येत असताना वाटेत जिल्हा परिषदेच्या शाळेत गेले. सोबत तहसीलदार सतीश सोनी होते. तेव्हा त्यांना शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून आली. शाळेतील शिक्षक विनापरवाना गैरहजर असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांसोबत विभागीय आयुक्तांनी संवाद साधला तेव्हा अनेक विद्यार्थ्यांना लिहिता व वाचता आले नाही. शाळेत विद्यार्थी संख्या अतिशय कमी होती. शाळेत एकूण १० शिक्षकांपैकी अवघे ४ शिक्षक उपस्थित असल्याचे दिसून आले. उर्वरित एक शिक्षक रीतसर रजेवर गेले होते, तर ५ शिक्षक अनधिकृतपणे गैरहजर असल्याचे दिसून आले.विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी गावकºयांसोबत संवाद साधला तेव्हा गावकºयांनी शिक्षकांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भापकर गावकºयांनी शिक्षकांची बाजू घेतल्यामुळे चिडले व म्हणाले की, तुम्ही जर अशा शिक्षकांची बाजू घेत असाल, तर पिढ्यान्पिढ्या बरबाद होतील. सातवीपर्यंतच्या मुलांना धड लिहिता येत नाही किंवा वाचताही येत नाही. यासंदर्भात तहसीलदार सतीश सोनी यांनी विभागीय आयुक्तांना सादर केलेला या शाळेचा एकंदरीत कारभाराचा अहवाल आज मुख्य कार्यकारी अधिकारी शिरसे यांना प्राप्त झाला. शिरसे यांनी गटशिक्षणाधिकारी साळुंके व शिक्षण विस्तार अधिकाºयांमार्फत शाळेला भेट देऊन अहवाल मागितला. त्यानुसार मंगळवारी पाच जणांना निलंबित करण्यात आले.
जटवाडा शाळेचे ५ शिक्षक तडकाफडकी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 2:04 AM