छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेसाठी भरपूर निधी आहे, पण एक-दोन हप्ते उचलल्यानंतर अनेक लाभार्थी घरकुलांचे पुढे बांधकाम करत नाहीत. त्यामुळे योजनेच्या पूर्णत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजपर्यंत तब्बल ५ हजार ९६० लाभार्थ्यांनी पहिला हप्ता उचलल्यानंतर त्यांनी घरकुल बांधण्याकडे पाठ फिरवली आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना राबविली जाते. ही आवास योजना सन २०१६-१७ पासून सुरू झाली. तेव्हापासून सन २०२१-२२ पर्यंत आपल्या जिल्ह्यासाठी ३६ हजार ५८ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले होते. यापैकी ३४ हजार ६०२ लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाचा काहींना २५ हजार, तर काहींना १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला. यापैकी २ हजार ९८८ लाभार्थ्यांनी घरकुल बांधण्याकडे दुर्लक्ष केले. तर, १ हजार ५१६ लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामाचा दुसरा हप्ता उचलल्यानंतर तसेच उर्वरित काही लाभार्थ्यांनीही घरकुल बांधकामाकडे कानाडोळा केला. आतापर्यंत ३० हजार ९८ घरकुले पूर्ण झाली आहेत.
आता दोन वर्षांच्या खंडानंतर गेल्या महिन्यात जिल्ह्यासाठी २५ हजार घरकुलांचे नवीन उद्दिष्ट जाहीर करण्यात आले. यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ५ हजार लाभार्थ्यांना १५ हजारांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण एका क्लिकवर करण्यात आले. मात्र, ‘डीआरडीए’ने २५ हजार घरकुलांना मंजुरी तर दिली. पण, अनेक लाभार्थ्यांपुढे स्वमालकीच्या जागेचा प्रश्न आहे. काहींची घरे गायरान जमिनीवर, तर काहींची ग्रामपंचायतींच्या अतिक्रमित जागांमध्ये आहेत. लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची प्रक्रिया (एफटीओ) करण्यास अगोदर संबंधितांनी जागेचा नमुना नं. ८ ‘अ’चा उतारा, बँकेसोबत जोडलेले आधार कार्ड जमा केल्यानंतर ‘डीआरडीए’चे अभियंते त्या जागेचे जिओ टॅगिंग करतात. त्यानंतर ‘एफटीओ’ची प्रक्रिया पूर्ण होते व संबंधितांच्या खात्यात घरकुलाचे हप्ते जमा होण्यास सुरुवात होते.
उद्दिष्ट मिळाले, जागेची कागदपत्र हवीतयासंदर्भात ‘डीआरडीए’चे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांनी सांगितले की, २०२१-२२ नंतर आता जिल्ह्यासाठी २५ हजार घरकुलांचे नवीन उद्दिष्ट मिळाले आहे. या घरकुल योजनेसाठी निधीचा तुटवडा नाही. मात्र, लाभार्थ्यांनी स्वमालकीच्या जागेचा नमुना नं. ८ ‘अ’चा उतारा व बँकेशी जोडलेले आधार कार्ड संबंधित अभियंत्याकडे जमा करावे. मग, त्यांच्या खात्यावर घरकुलाचा पहिला हप्ता जमा करण्याची प्रक्रिया गतीने करता येईल.