औरंगाबाद : शहरात दररोज जमा होणाऱ्या कचऱ्यावर मनपाकडून चिकलठाणा, पडेगाव, कांचनवाडी येथे शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते. खत निर्मितीचे हे प्रकल्प ३ वर्षांपासून यशस्वीरीत्या सुरू आहेत. आतापर्यंत चिकलठाणा आणि पडेगाव येथील प्रकल्पात ५ हजार १९० टन खताची निर्मिती झाली आहे. या कचऱ्यातून खतापेक्षा जास्त ६ हजार ५५ टन एवढे ड्रायवेस्टच निघाले.
शहरात २०१६ मध्ये कचराकोंडी निर्माण झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेला शंभर टक्के अनुदान देण्याचे घोषित केले. मनपाच्या १४८ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. महापालिकेने चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल व कांचनवाडी अशा चार ठिकाणी प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. हर्सूल वगळता इतर तीन प्रकल्प सुरू झाले आहेत. चिकलठाणा व पडेगाव प्रकल्पांची क्षमता दररोज १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची आहे. तीन वर्षांपूर्वी चिकलठाणा येथील प्रकल्प सुरू झाला तर दोन वर्षांपूर्वी पडेगावचा प्रकल्प सुरू झाला. या दोन्ही प्रकल्पात आत्तापर्यंत खासगी एजन्सीने ५ हजार १९० टन खताची निर्मिती केली असल्याचे घन कचरा विभागाचे प्रमुख सोमनाथ जाधव यांनी सांगितले. तयार केलेले खत दीड हजार रुपये टन या दराने खासगी कंपन्यांना विकले जात आहे. कचऱ्यातून खतापेक्षा ड्रायवेस्टच जास्त निघाल्याचे समोर आले आहे. ८ हजार ५५ टन ड्रायवेस्ट आतापर्यंत अंबुजा सिमेंट, सोशल लॅबला देण्यात आले आहे.
हॉटेल वेस्ट मिळेनाकांचनवाडी येथे ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाची दररोज २५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. पण महापालिकेला फक्त साडेचार टन ओला कचरा मिळत आहे. अनेक हॉटेल चालक महापालिकेला शिळे उरलेले अन्न देण्यास टाळाटाळ करीत आहेत. हॉटेल वेस्ट जमा करण्यासाठी घन कचरा विभागाने स्वतंत्र घंटागाड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी महापालिकेच्या घंटागाड्यात ओला कचरा द्यावा, असे आवाहन जाधव यांनी केले.