- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात फक्त महिलांसाठी असणारी ५ स्वच्छतागृहे पुढील सहा महिन्यात उभी राहतील, अशी घोषणा २०१७ साली करण्यात आली होती. या घोषणेला ४ वर्षे होत आली, तरी एकही स्वच्छतागृह महिलांनी वापरण्याजोगे नाही. आधी ही ५ स्वच्छतागृहे तर बनवा आणि मग ५० च्या गप्पा करा, अशा संतप्त भावना शहरातील महिलांनी व्यक्त केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी, शहरात १०० सार्वजनिक स्वच्छतागृहे उभी करण्याची घोषणा केली आहे. यापैकी ५० स्वच्छतागृहे पुरुषांची आणि ५० स्वच्छतागृहे महिलांची असणार आहेत. पण जिथे ५ बनविणे अशक्य झाले, तिथे ५० ची गोष्ट काय करता?, अशा भाषेत औरंगाबादकरांनी या घोषणेची खिल्ली उडविली आहे.
१०० स्वच्छतागृहे नव्याने सुरू करण्याऐवजी, सध्या जी स्वच्छतागृहे शहरात आहेत, त्यांचीच परिस्थिती सुधारा. आणि १०० नको, पण केवळ १० स्वच्छतागृहे उभारा, अशी मागणी औरंगाबादकर करत आहेत. बेगमपुरा, पैठणगेट, बॉटनीकल गार्डन, औरंगपुरा आणि जुब्ली पार्क अशा पाच ठिकाणी केवळ महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याचे मनसुबे ४ वर्षांपूर्वी आखण्यात आले होते. यासाठी ६५ लाखांपेक्षाही अधिक रकमेची तरतूद करण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीत बेगमपुरा आणि औरंगपुरा या भागातील स्वच्छतागृहे पूर्ण झाली असली तरी, कुलूपबंद अवस्थेत आहेत. बॉटनीकल गार्डन येथील स्वच्छतागृहाचा स्लॅब टाकून झाला आहे, तर जुब्ली पार्क आणि पैठणगेट या ठिकाणची स्वच्छतागृहे अजूनही जागेच्या वादाच्या भोवऱ्यात आहेत. मग या ५ स्वच्छतागृहांची अशी बोंब असताना, १०० चा कारभार पूर्ण होईपर्यंत औरंगाबादकरांच्या किती पिढ्या होऊन जातील, असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.
भीक नको, पण कुत्रे आवरपाठपुरावा तरी किती करायचा? सारखी मागणे करून करून शेवटी, भीक नको, पण कुत्रे आवर... अशी आमची परिस्थिती झाली आहे. ५ स्वच्छतागृहे उभी राहिली नाहीत, आता ५० जर उभी राहिली, तर ती शहरातल्या महिलांसाठी आनंदाची बाब असेल. ही स्वच्छतागृहे फायबरची बनविण्यात येणार आहेत. परंतु फायबरचा वापर न करता गुजरात, इंदोरसारखी स्टेनलेस स्टीलची टिकाऊ स्वच्छतागृहे बनवावीत. पण हे सगळे प्रत्यक्षात होईपर्यंत, आतापर्यंतच्या अनुभवावरून तरी साशंकताच आहे.- ॲड. माधुरी अदवंत