लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेला तब्बल ५० एकर शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात येईल. या जागेवर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी १०० कोटींचा निधीही मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन प्रभारी मनपा आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी दिले. शहर विकासासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येतील. कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.मंगळवारी सकाळीच प्रभारी आयुक्त महापालिकेत दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम विभागप्रमुखांसोबत बैठक घेतली. प्रत्येक विभागाच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. अधिका-यांना त्यांनी सांगितले की, प्रत्येक विभागप्रमुखाने अत्यावश्यक कामे माझ्याकडे आणावीत. ती युद्धपातळीवर मंजूर करून देण्यात येतील.आपण मनपात दोन दिवस किंवा दोन आठवडे राहणार आहोत. या काळात कोणतेही काम प्रलंबित असायला नको. नागरिकांचे समाधान होईल, या दृष्टीने सकारात्मक कामे करा, असे आवाहनही त्यांनी केले.यानंतर नवल किशोर राम यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेतली. यावेळी एक छोटीसी बैठकही घेण्यात आली. बैठकीस उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, सभागृहनेता विकास जैन, विरोधी पक्षनेता फेरोज खान, गटनेता भाऊसाहेब जगताप, नासेर सिद्दीकी, नगरसेविका स्मिता घोगरे, सुरेखा सानप आदींची उपस्थिती होती. महापौरांनी ३५ विकास कामांची यादी प्रभारी आयुक्तांकडे सुपूर्द केली. शहर आणि महापालिकेसाठी अत्यावश्यक कामांना प्राधान्य द्या, अशी विनंती त्यांनी केली.महापौरांनी सादर केलेल्या कामांची यादीमनपाच्या मालकीच्या जागांचे पी.आर.कार्ड तयार करावेत, भूमिगत गटार योजना पूर्ण करावी, १५० कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू करावी, शासनाकडे थकीत अनुदान आणण्यासाठी पाठपुरावा करावा, नवीन मालमत्ता कर आकारणीसाठी कडक धोरण निश्चित करावे, महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी, सफारी पार्कच्या जागेवरील अतिक्रमण काढावे, संत एकनाथ रंगमंदिर अद्ययावत करून संत तुकाराम नाट्यगृहाचे खाजगीकरण करावे, हर्सूल तलावाजवळ जांभूळवन विकसित करावे, ज्योतीनगर जलतरण तलावाचा निर्णय घ्यावा, आमखास मैदानाजवळ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या पाल्यांसाठी वसतिगृह सुरूकरावे, सातारा-देवळाईसाठी शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करावा, पाणीपुरवठ्यासाठी नवीन तीन अभियंते घ्यावेत, स्मार्ट सिटीत एलईडी, शहर बसचा मुद्दा मार्गी लावावा, गरवारे क्रीडा संकुल येथे स्वमिंग पूल, बॅडमिंटन कोर्ट अद्ययावत करावे आदी मागण्या यात केल्या आहेत.
५० एकर जागा, १०० कोटी निधी मिळवून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:37 AM