औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटींचा निधी दिला आहे. महापालिकेच्या वाट्याला ५० कोटींत ९ रस्ते आले आहेत. त्यातील अमरप्रीत ते एकता चौक या रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्याची माहिती कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी दिली. उर्वरित ८ रस्त्यांच्या मार्किंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
शहरातील २३ रस्त्यांसाठी राज्य शासनाने १५२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून रस्ते विकास महामंडळ व एमआयडीसी प्रत्येकी ७ तर महापालिका ९ रस्ते विकसित करणार आहे. महापालिका वगळता इतर विभागांची कामे अगोदरच सुरू झाली आहेत. एमआयडीसीच्या कंत्राटदारांनी आणि प्रशासनाने या कामांमध्ये आघाडी घेतली. रस्त्यांची दर्जेदार कामे एमआयडीसीकडून केली जात आहेत. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही रस्त्यांच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. एमआयडीसीने जवळपास ८० टक्के काम पूर्ण केले आहे. रस्ते विकास महामंडळ आणि महापालिका कामांच्या बाबतीत बरेच मागे आहे. एमआयडीसीने शासनाकडून निधी प्राप्त होण्यापूर्वीच पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशावरून कामाला सुरुवात केली.महापालिकेकडून सध्या हॉटेल अमरप्रीत ते एकता चौक रस्त्याचे काम सुरू आहे. उर्वरित ८ रस्त्यांची मार्किंग आणि काही ठिकाणी अतिक्रमणे असल्यास ती काढून त्वरित कामे सुरू करण्यात येणार आहेत, असे कोल्हे यांनी सांगितले. महापालिकेच्या नगररचना विभागाची या कामासाठी मदत घेण्यात येत आहे.