विजय सरवदे
औरंगाबाद : दीड महिन्याच्या लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यातील ५० टक्के उद्योग प्रभावित झाले असून ३० ते ४० टक्के क्षमतेने उत्पादन क्षमता घटली होती. गेल्या दोन दिवसांपासून ‘अनलॉक’नंतर उद्योगांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसू लागले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरातील बाजारपेठा बंद होत्या. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत लॉकडाऊन सदृश स्थिती होती. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्यामुळे प्रशासनाचा संसर्ग कमी करण्यावर भर राहिला. दरम्यान, औरंगाबादेत १५ एप्रिलपासून लॉकडाऊन लागले होते. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थानिक प्रशासनाने ७ जूनपासून ‘अनलॉक’ जाहीर केले. अन्य जिल्ह्यांतही लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यामुळे राज्यातील बाजारपेठा सुरू झाल्या आहेत.
तथापि, जिल्ह्यातील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, चितेगाव या औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना लॉकडाऊनचा बऱ्यापैकी फटका बसला. स्थानिक (देशांतर्गत) बाजारपेठा बंद असल्यामुळे ५० टक्के उद्योगांनी उत्पादन क्षमता कमी केली. ऑर्डरचे प्रमाणही ३०-४० टक्क्यांनी कमी झाले. परिणामी, लघु व मध्यम उद्योगांचे अर्थचक्र कोलमडून गेले. बजाज ऑटोसारख्या मोठ्या उद्योगावरही आठवड्यात एक दिवसाचा ‘शट डाऊन’ घेण्याची वेळ आली. त्यामुळे व्हेंडर्स उद्योग अडचणीत आले.
दोन दिवसांपासून आता स्थानिक उद्योगांनी गती पकडली असून ६० ते ७० टक्के क्षमतेने उत्पादन सुरू झाले आहे. औरंगाबादेतील लॉकडाऊन उघडल्याचा सर्वत्र संदेश पोहोचला, तर गावी गेलेले परप्रांतीय मजूरही लवरकच परत येतील, अशी शक्यता उद्योगांनी वर्तविली आहे.
उद्योगांच्या स्थितीबाबत उद्योजकांनी सांगितले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत अर्थात मागील वर्षाच्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक उद्योग सोडले, तर उर्वरित कंपन्या बंद होत्या. यंदा दुसऱ्या लाटेत खबरदारी घेत उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी होती. मात्र, बाजारपेठाच बंद असल्यामुळे उत्पादित माल विक्रीविना पडून राहिला. त्यामुळे उद्योगांनी स्वत:हूनच उत्पादन क्षमता कमी केली.
चौकट...................
जिल्ह्यातील उद्योग आता गती घेतील
यासंदर्भात ‘सीआयआय’चे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ उद्योजक मुकुंद कुलकर्णी व ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत यांनी सांगितले की, आता सगळीकडे बाजारपेठा उघडल्या असल्यामुळे उद्योगांमध्ये आत्मविश्वास आला असून हळूहळू उत्पादन क्षमता वाढेल. या दोनच दिवसांत ६० ते ७० टक्के उत्पादन क्षमतेने उद्योग सुरू झाले आहेत. येत्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातील उद्योग पूर्वपदावर येऊ शकतात.