छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये संशोधन करून डॉक्टर होण्यासाठी चढाओढ निर्माण झाल्याचे चित्र आहे. सध्या कार्यरत ४०७ शिक्षकेतर अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ५० पेक्षा अधिक जणांनी मागील काही वर्षांत पीएच.डी. पदवी मिळवली, तर ३० जण संशोधन करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सध्या सहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी पीएच.डी.चे संशाेधन करीत आहेत. त्यात प्राध्यापक, विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, विद्यापीठात नोकरी करताना आपणही पीएच.डी. झाले पाहिजे, असे वाटणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. २००२ साली विद्यापीठात शिक्षकेतर अधिकाऱ्यांमधून पहिल्यांदाच डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी पीएच.डी. मिळवली. तेव्हापासून शिक्षकेत्तर कर्मचारी संशाेधनाकडे चांगलेच वळले. सध्या विद्यापीठात ७७७ मंजूर पदांपैकी ४०७ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील ५० पेक्षा अधिक जणांनी पीएच.डी. प्राप्त केली, तर ३० जणांचे पीएच.डी.चे संशोधन सुरू आहे. विशेष म्हणजे पीएच.डी. केल्यावर प्राध्यापकांसारखा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणताही आर्थिक लाभ मिळत नाही.
वर्ग-१ मधील पीएच.डी.प्राप्त अधिकारीविद्यापीठातील वर्ग-१ मध्ये पीएच.डी. मिळविणाऱ्यांमध्ये डॉ. कैलास पाथ्रीकर, डॉ. गणेश मंझा, डॉ. दिगंबर नेटके, डॉ. संजय कवडे, डॉ. आय.आर. मंझा, डॉ. विष्णू कऱ्हाळे, जनसंपर्क अधिकारी डॉ. संजय शिंदे, डॉ. गिरीश काळे, डॉ. सतीश पद्मे, डॉ. आनंदा वाघ आदींचा समावेश आहे तसेच हेमलता ठाकरे, संजय हुसे, गजानन खिस्ते, अरविंद भालेराव, पी. एस. जाधव हे संशोधन करीत आहेत. वर्ग-२ अधिकाऱ्यांमध्ये ५ जणांना पीएच.डी. जाहीर असून, १० जणांचे संशोधन सुरू आहे. वर्ग-३ व ४ मधील २० जणांनी पीएच.डी. प्राप्त असून, ३० पेक्षा अधिक जण पीएच.डी.चे संशाेधन करीत आहेत.
विद्यावाचस्पती तरी कंत्राटीवर कामविद्यावाचस्पती म्हणजेच पीएच.डी.ची पदवी प्राप्त केल्यानंतरही पूर्णवेळ व तासिक तत्त्वावर प्राध्यापकाची नोकरी मिळत नाही. त्यामुळे डॉ. संतोष काळे, डॉ. अनिल केदारे, डॉ. संजय गायकवाड, डॉ. राजहंस वानखेडे आणि डॉ. चंद्रशेखर जाफरे हे तरुण विद्यापीठात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहेत. या कामातून पीएच.डी.प्राप्त तरुणांना फक्त ११ ते १२ हजार रुपये हातात पगार मिळतो.