छत्रपती संभाजीनगर : ३५ शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची लयबद्ध रॅली, बॅण्ड, लेझीम पथकाच्या सहभागाने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. निमित्त होते शिक्षण विभागाने काढलेल्या 'रन फॉर एज्युकेशन रॅली'चे. भारताना जी' २० परीषद आयोजित करण्याचे यजमानपद मिळाले आहे. त्यातील शिक्षणविषयक परिषद पुण्यात होत आहे. त्यानिमित्ताने शिक्षण विभागाने जनजागृती रॅली फ्रान्सलियन स्कूल ऑफ एक्सलन्स ते विभागीय क्रीडा संकुलापर्यंत मंगळवारी सकाळी काढली होती.
महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत व शिक्षण विभागाचे उपसंचालक अनिल साबळे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर रॅलीला सुरूवात झाली. ही रॅली श्री गजानन महाराज मंदिर, जवाहरनगर, सुतगिरणी मार्गे मार्गक्रमण होऊन विभागीय क्रिडा संकूल येथे पोहचली. या रॅलीत विद्यार्थ्यांनी निपून भारत, शिक्षण हक्क कायदा, पायाभूत सुविधा, साक्षरता संख्याज्ञानसह इतर शैक्षणिक योजनांचे फलक घेवून शिक्षणाविषयी जनजागृती केली. विभागीय क्रीडा संकुलात रॅली पोहचल्यानंतर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आ. हरिभाऊ बागडे, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. रॅलीच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख, शिक्षण उपनिरीक्षक डॉ. सतीश सातव, शिक्षण विस्तार अधिकारी सिताराम पवार, डायटचे डॉ. रवी जाधव, डॉ उज्वल करवंदे, विनायक वाघ आदींनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांची उपस्थिती कौतुकास्पद : डॉ. कराड
पायाभूत, साक्षरता आणि संख्याज्ञान हा विषय केंद्रस्थानी ठेवून शिक्षण विभागातर्फे नियोजन करण्यात येत आहे. विभागीय स्तरावर घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी दर्शविलेली उपस्थिती कौतुकास्पद असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले. यावेळी आ. बागडे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण लोहाडे यांनी केले. यावेळी डायटचे प्रा. डॉ. कलिमोद्दीन शेख, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, अरुणा भूमकर, सहायक उपसंचालक रविंद्र वाणी यांच्यासह शिक्षण विभागातील पदाधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.