- प्रसाद कुलकर्णी
मानवाला चांदोमामाचे बालपणापासूनच आकर्षण असते. आकाशमंडलात रात्री सर्वात मोठा (व जवळचाही) तोच वाटतो! पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्राच्या कला हजारो वर्षांपासून मानवाला कालगणनेसाठी मार्गदर्शक ठरत आल्या आहेत. चंद्रामुळे पृथ्वीवरील भरती-ओहोटी, वादळे वगैरे हवामानावरील परिणाम चंद्राचे पृथ्वीशी जवळचे नाते दर्शवितात. अर्थात आपल्याला (पृथ्वीवरून) चंद्राचा फक्त समोरचा भाग (सन्मुख बाजू) दिसतो. याचे कारण म्हणजे पृथ्वीचे सूर्याभोवती व चंद्राचे पृथ्वीभोवती विशिष्ट गतीने होत असलेले परिभ्रमण. चंद्राच्या आपल्याला दिसणाऱ्या बाजूवरील डागांना ‘मारिया’ असे म्हणतात. हे डाग म्हणजे लाव्हापासून बनलेले अग्निजन्य खडक आहेत. ते लाखो वर्षांपूर्वीचे असल्याचा कयास आहे. चंद्रावर पर्वतरांगाही आहेत आणि अनेक प्राचीन विवरेही! ही विवरे उल्कापात व धूमकेतूंच्या धडकेने तयार झाल्याचे खगोलशास्त्रज्ञ मानतात.
चंद्राच्या उत्पत्तीबाबत जाणकारांमध्ये मतभिन्नता आढळते. त्यातील प्रमुख सिद्धांतानुसार सुमारे ४५ अब्ज वर्षांपूर्वी चंद्राची उत्पत्ती झाल्याने अनेक खगोलशास्त्रज्ञ मानतात. पूर्वी असे मानले जायचे की, चंद्राची उत्पत्ती पृथ्वीपासूनच निघालेल्या तुकड्यापासून झाली असावी; पण अलीकडे असे मानले जाते की, अंतराळातून साधारणपणे मंगळाच्या आकाराची काही तरी वस्तू पृथ्वीवर धडकली व त्या वस्तू आणि पृथ्वीच्या टकरीतून अवकाशात विखुरल्या गेलेल्या (दोन्हींच्या) अवशेषांतून चंद्र तयार झाला असावा. नंतर चंद्राला ज्वालामुखीच्या उद्रेकांबरोबरच लघुग्रह, उल्कापात, धूमकेतूंच्या धडका यांचे असंख्य आघात सहन करावे लागले. यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाचे खिंडन तर झालेच; शिवाय काही ठिकाणी मोठमोठ्या पाषाणांचीही अक्षरश: भुकटी बनली.
या सर्व आघातांचा परिणाम म्हणून चंद्रावर लाकडी कोळसा व पडझडीच्या या अवशेषांचे आवरण आहे. पृष्ठभाग धूळ, खडक यांनी व्यापला आहे. चांदोबाच्या पोटातही मोठमोठे खडक व शिळा आहेत. चंद्रावर पहिले मानवरहित यान सोव्हिएत रशियाने १९५९ मध्ये ल्युना १ व २ या नावाने पाठविले होते. त्या पाठोपाठ अमेरिकेनेही मोठी भरारी घेत १९६१ पासून चंद्राचा जवळून वेध घेणे सुरू केले. चंद्राची जवळून आणखी काही माहिती मिळते का, तेथे नक्की काय आहे, पाणी आहे का, याचीही चाचपणी करण्यात आली.
२० जुले १९६९ रोजी अमेरिकेच्या यानातून २ अंतराळवीरांनी चंद्रावर पहिली स्वारी केली. त्यांनी तेथून तब्बल ३८२ किलो खडक-मातीचे नमुने अभ्यासासाठी आणले. नंतर १९९० मध्ये अमेरिकेचे यंत्रमानव चंद्रावर जाऊन आले. या दोन्ही मोहिमांनंतर चंद्रावर बर्फ असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. या मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून २०११ मध्ये अमेरिकन वैज्ञानिकांनी चंद्र आणि सूर्य यांच्यातील संबंध तसेच चंद्रावरील विवरे यावर संशोधन सुरू केले. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचेही शास्त्रज्ञांना पूर्वीपासूनच कुतूहल आहे. २०२४ मध्ये चंद्रावर पुन्हा अंतराळवीर पाठविणार असल्याचे नासाने अलीकडेच जाहीर केले.युरोपियन अंतराळ संस्था, जपान, चीन व भारत या सर्वांच्याच चांद्र- संशोधनाबाबत महत्त्वाकांक्षी मोहिमा आहेत. चीनने दोन रोव्हर याने आतापर्यंत चंद्रावर उतरवली आहेत. अर्थात या देशांच्या या सरकारी मोहिमा होत्या; पण अशात एप्रिल २०१९ मध्ये तर इस्त्रायलमधील एका खाजगी कंपनीनेही चंद्रावर यान उतरवण्याचा प्रयत्न केला; पण दुर्दैवाने ते यान अपघातात नष्ट झाले.
भारताचे पहिले अंतराळवीर अंतराळ भ्रमंती करणारे भारताचे पहिले अवकायात्री राकेश शर्मा यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘अंतराळातून भारत कसा दिसतो’? असे विचारले असता ‘सारे जहाँ से अच्छा...’ हे त्यांचे स्वयंस्फूर्त उद्गार ऐकून तमाम भारतीयांना अभिमानाने आकाश ठेंगणे झाले. ३ एप्रिल १९८४ रोजी सोयाज-टी-११ या यानातून रशियाच्या दोन अंतराळवीरांसोबत ते सॅल्यूट अंतराळ केंद्राकडे रवाना झाले. आठ दिवसांच्या सफरीनंतर ११ एप्रिल रोजी ते परतले.