औरंगाबाद : सातारा जिल्ह्यात कास पठाराच्या धर्तीवर जिल्हयात काही ठिकाणी झकास पठारचा विकास केला जाणार आहे. येथील दुर्मीळ वनस्पती, रानफुलांचे संवर्धन, पर्यटकांना आकर्षित करेल. त्याशिवाय जिल्ह्यातील केवळ हिवाळी, उन्हाळी पर्यटन पावसाळ्यातही वाढेल असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी व्यक्त केला. त्याला जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्यांनी दाद देत या उपक्रमासाठी उपकरातून ५१ लाखांचा निधी पुढील वर्षातील उपाययोजांसाठी नियोजीत करण्याचा ठराव घेतला.
जिल्ह्यातील पठारांवरचे आवश्यक मातीपरिक्षण, साधनसामुग्रीचा विचार करुन रानफुलांचे पठारावर घनदाट ताटवे तयार करण्याची गरज आहे. त्या पठाराभोवतीचे पाच ते सहा गावांचा समुह विकास करुन झकास पठारचे जिल्हात सुरुवातीला पाच ते सहा पठारे विकसीत करण्यात येतील. यावर्षी रानफुलांच्या ७० प्रकारच्या १७५ किलो बियाने जमा केले आहे. त्याची लागवड, त्या प्लाॅटला संरक्षण, त्याचे सपाटीकरण आदींसाठी काही निधी लागणार आहे. असे डाॅ. गोंदावले यांनी सांगितले. यासाठीची मान्यतेची प्रक्रीया सध्या सुरु असून पालकमंत्री सुभाष देसाई व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमोर ही संकल्पना मांडण्यात आली असून त्यांच्याकडून या प्रकल्पाला सहमती मिळाली आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांकडे या प्रकल्पाचे सादरीकरण करणार असल्याची माहीती त्यांनी सभागृहाला दिली. आपल्याकडे जून ते आॅक्टोबर दरम्यान पर्यटकांचा ओघ घडतो. तो ओघ या झकास पठारांमुळे वाढेल. शिवाय स्थानिक लोकांना अर्थार्जनही होईल, तर सीएसआर मधुनही या प्रकल्पाला मदत मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ठ केले.