लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी जिल्ह्यातील निर्भया अर्थात महिला पोलीस मित्रांचे जाळे मजबूत करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यासाठी या महिलांना पोलीस ठाण्यांनीही अपेक्षित सहकार्य करण्यास बजावले असून त्यांच्या माध्यमातून महिला अत्याचाराच्या प्रकरणांसह इतर अवैध धंद्यांनाही लगाम घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.यापूर्वी पोलिसांचे खबऱ्यांचे जाळे एवढे मजबूत असायचे की, त्यांच्या माध्यमातून पोलिसांना अल्पावधीत तपासाचे धागेदोरे मिळायचे. आजही काही प्रमाणात हे जाळे असले तरीही वाढती लोकसंख्या, बदलते गुन्ह्यांचे स्वरुप, लोप पावत चाललेली सामाजिक बांधिलकी अन् अपुरे पोलीस अधिकारी-कर्मचारी बळ या पार्श्वभूमिवर पोलिसांना प्रत्येक गावावर वचक ठेवणे शक्य नाही. त्यातच मागील काही वर्षांत महिला अत्याचाराची प्रकरणे वाढू लागली आहेत. त्यामुळे अशा महिलांना गावातच आधार मिळावा, त्यांना न्यायाची कायदेशीर प्रक्रिया माहिती व्हावी, त्यांनी अत्याचाराला बळी पडू नये, यासाठी पोलीस जेथे पोहोचत नाहीत, अशा ठिकाणी निर्भया अर्थात महिला पोलीस मित्र नेमल्या आहेत. त्यांची नुकतीच कार्यशाळाही झाली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला.याबाबत पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया म्हणाले, महिलांना सुरक्षा देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. निर्भयांच्या पाठीशी पोलीस प्रशासन पूर्णपणे उभे राहणार आहे. त्यांनी मुली, महिलांमध्ये जागृती करावी. त्यांच्यावर अत्याचार होत असल्यास पोलिसांपर्यंत ही बाब कळवावी. इतरही अवैध बाबी होत असल्यास त्याची माहिती दिली तरीही त्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यांनी नावाप्रमाणेच कायद्याचे पालन होण्यासाठी समाजात निर्भयपणे वागावे, असे आवाहन त्यांनी केले.या निर्भयांना कायद्याच्या माहितीची पुस्तके दिली असून त्यानुसार त्यांनी गावासह शाळेत जागृती करायची आहे. महिला व मुलांवरील अत्याचाराची या पुस्तकांत उपयुक्त माहिती आहे.
जिल्ह्यात ५१६ निर्भयांचे जाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 11:58 PM