लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वाटप न करणाºया जिल्ह्यातील ५४ रेशन दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी केली आहे. त्यामुळे येथून प्रत्येक दुकानदाराला ई-पॉस मशीनच्या सहाय्यानेच धान्य वाटप करणे बंधनकारक झाले आहे.परभणी जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरित करण्याची प्रक्रिया मे महिन्यापासून सुरु झाली आहे. जिल्ह्यामध्ये १ हजार १८७ परवानाधारक स्वस्तधान्य दुकानदार असून या सर्व दुकानदारांना पुरवठा विभागाने ई-पॉस मशीन उपलब्ध करुन दिल्या आहेत. ग्रामीण भागातील गोर-गरीब लाभार्थ्यांपर्यंत त्यांच्या हक्काचे धान्य पोहचावे, या उद्देशाने ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण करताना संबंधित लाभार्थी कुटुंबातील एका सदस्याचा अंगठ्याचा ठसा आवश्यक आहे. हा ठसा घेतल्यानंतर मशीनवर कुटुंबाला मिळणारे एकूण धान्य, त्याची किंमत आदी माहिती उपलब्ध होते आणि धान्य वितरित झाल्यानंतर ही माहिती संकेतस्थळावर आॅनलाईन भरली जाते. या पद्धतीमुळे प्रत्यक्ष लाभार्थ्यालाच धान्य मिळणार आहे. तसेच धान्याचा काळा बाजार थांबणार आहे. जिल्ह्यात ३० मे २०१७ रोजी सर्व रेशन दुकानदारांना ई-पॉस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच २९ मार्च ते ४ एप्रिल या काळात सर्व दुकानदारांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना मशीन हाताळण्याची माहिती तांत्रिक अधिकाºयांमार्फत देण्यात आली. तसेच ई-पॉस मशीनचे लिंकही करुन देण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक दुकानदाराने मशीनच्या सहाय्यानेच धान्य वाटप करणे अपेक्षित आहे. आॅगस्ट महिन्यात जिल्ह्याला मिळालेल्या धान्याचा कोटा लाभार्थ्यांना वितरित झाला आहे. हा संपूर्ण कोटा उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने ई-पॉस मशीनच्या सहाय्याने किती जणांनी धान्याचे वितरण केले, याची माहिती घेतली. यात काही दुकानदारांनी या मशीनच्या सहाय्याने धान्य वितरित करण्यास टाळाटाळ केल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात ५४ दुकानदारांनी आॅगस्ट महिन्यात या मशीनवर किमान दहा ट्रान्झेंक्शन केले नाही, अशी माहिती समोर आली. सर्व धान्य ई-पॉस मशीनच्या सहाय्यानेच वितरित करणे आवश्यक असताना या कामात कसूर केल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी ५४ रेशन दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय ५ सप्टेंबर रोजी एका आदेशानुसार हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे रेशनदुकानदारांमध्ये खळबळ उडाली असून आता या दुकानदारांना ई-पॉस मशीनचा वापर करण्याशिवाय गत्यंतर नाही.
५४ रेशन दुकानदारांची अनामत केली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 12:08 AM