छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजना डिसेंबर २०२४मध्ये पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर (मजीप्रा) राजकीय दबाव टाकण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय मंडळींनी पाण्यासाठी आग्रह धरला असला तरी ‘मजीप्रा’च्या बँक खात्यात फक्त ५५ कोटी रुपये शिल्लक आहेत. योजना पूर्ण करण्यासाठी ८३५ कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी ‘मजीप्रा’ने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
शहराची तहान भागविण्यासाठी २,७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. आतापर्यंत या योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून १,४२४ कोटी १७ लाख रुपये आले. हा निधी मनपाने त्वरित ‘मजीप्रा’कडे वर्ग केला. त्यातील १,३६८ कोटी रुपये आतापर्यंत झालेल्या कामांवर खर्चही झाले. कंत्राटदार कंपनीकडून अनेक बिले दाखल करण्यात आली. कंपनीकडून सातत्याने बिलांची मागणी होतेय. मजीप्राकडे फक्त ५५ कोटी ३५ लाख रुपये शिल्लक आहेत. योजना पूर्ण करण्यासाठी ८३५ कोटी रुपयांची गरज आहे. सप्टेंबर किंवा ऑक्टाेबरपर्यंत हा निधी द्यावा, असे ‘मजीप्रा’ला अपेक्षित आहे. मजीप्राने या योजनेवर ३ टक्के सेवा कराची मागणी केली. त्यानुसार किमान ९०० कोटी रुपये द्यावे लागतील. मागील महिन्यातच यासंदर्भातील पत्र आम्ही मनपाला दिल्याचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी सांगितले.
योजनेचे डिझाइन २,७४० कोटी रुपयांच्या योजनेत केंद्र शासन २५ टक्के म्हणजेच ६८५ कोटी रुपये देईल. राज्य शासन अनुदान ४५ टक्के म्हणजे १,२३३ कोटी आणि मनपाचा वाटा ८२२ कोटी रुपये ठरविण्यात आला. मनपाने यापूर्वीच एवढा निधी आमच्याकडे नसल्याचे शासनाला कळविले. शासनाने मनपाला ‘सॉफ्ट लोन’ देण्याचे आश्वासन दिले होते.
तरतूदच नाहीयोजना डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण व्हावी म्हणून राजकीय मंडळींकडून बैठकांचे सत्र सुरू आहे. योजनेसाठी आर्थिक तरतूदही करून देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी स्वीकारायला तयार नाहीत. मनपाचा वाटा वेळेवर दाखल न केल्यास योजनेला आणखी काही महिने विलंब होऊ शकतो, अशी शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
८३५ कशासाठी हवेत? १५० कोटी- कंत्राटदार देयक- असाधारण भाववाढ ७० कोटी- पाणीपुरवठा पुनरुज्जीवन योजना १४९ कोटी- यांत्रिकी कामे करण्यासाठी २१ कोटी- यांत्रिकीची अन्य कामे ५०० कोटी- जून ते डिसेंबरपर्यंतचा निधी.