औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कार्यरत प्राध्यापकांच्या संशोधनासाठी ‘रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट सेल’कडून निधी देण्याला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. तसेच प्राध्यापकांसोबतच कर्मचाऱ्यांकडून ५५ प्रस्ताव आले. छाननी नंतर पुढील आठवड्यात सादरीकरण होईल. त्यानंतर लगेचच लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या प्राध्यापकांना संशोधनासाठी ५ लाखांपर्यंत संशोधन निधी दिला जाणार आहे.
रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट सेलमध्ये ‘रिसर्च ॲडव्हायझरी काउन्सिल’ची स्थापना करण्यात आली. कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यांच्या समितीचे सदस्य सचिव आणि ‘सेल’चे संचालक म्हणून अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दर्जेदार संशोधन विद्यापीठात होत आहे. संशोधन आणखी समाजाभिमुख करण्यासाठी ‘रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट सेल’ काम करेल. विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी दर्जेदार शोधनिबंध, संशोधन पेटंट नोंदणीकरिता हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्याचा निर्णयही व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आला आहे. त्यासाठी एक कोटीची तरतूदही करण्यात आली आहे.
महाविद्यालयांनाही आर्थीक पाठबळमहाविद्यालयांत संशोधनाची वातवरण निर्मीतीसाठी विद्यापीठाने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय संशोधन परिषद, कार्यशाळा, सेमिनारसाठी मार्गदर्शक तत्वे तयार केले आहे. त्यानुसार आयोजन केल्यास विद्यापीठ ५० हजार ते दीड लाखांपर्यंत निधी देणार आहे.
संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी...‘रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट सेल’ कडे ५५ प्रस्ताव आले. त्याची छाननी करून २१ व २२ नोव्हेंबर रोजी सादरीकरणानांतर लगेच निवड करू. विद्यापीठ निधीतून प्राध्यापकांच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देण्यात येईल. ३ कर्मचाऱ्यांचेही प्रस्ताव आहेत. संशोधनाचा दर्जा तपासून निवड झाल्यास विद्यापीठ त्या कर्मचाऱ्यांनाही मदत करेल. याशिवाय महाविद्यालयांनाही संशोधनासंबंधी विविध परिषद, कार्यशाळा, सेमिनार घेण्यासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.-डाॅ. प्रमोद येवले, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद